महसूल विभागाचे दुर्लक्ष : अहोरात्र वाहतुकीने पांदण रस्ता उखडलालोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत असून अहोरात्र होणाऱ्या वाहतुकीने या परिसरातील रस्तेही उखडले आहेत. सर्व प्रकार बिनबोभाटपणे सुरू असताना महसूल प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.उमरखेड तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते. अनेक ठिकाणी रेतीघाट निर्माण झाले आहे. त्या ठिकाणावरून घाटांचा लिलाव महसूल प्रशासन करते. परंतु यंदा काही घाटांचा लिलावच झाला नाही. त्यामुळे रेती तस्करांचे चांगभले होत आहे. बिटरगाव बु. गावाजवळ असलेल्या रेतीघाटावर अहोरात्र रेतीचा उपसा केला जात आहे. ट्रॅक्टर, ट्रकद्वारे रेतीची वाहतूक केली जात आहे. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला पांदण रस्ता या अवजड वाहतुकीने पूर्णत: उखडला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर वाळू तस्कर शेतकऱ्यांना धमकावतात. रेती तस्कर शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवित आहे. पैनगंगा नदीवरील सावळेश्वर रेतीघाटाचा यंदा लिलाव झाला होता. तो रेतीघाट राजेश्वर ट्रेडिंग कंपनीने घेतला होता. परंतु सदर रेतीघाट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सरकारजमा केला. त्यानंतर मात्र या रेतीघाटावर मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू झाली. मंडळ अधिकारी आणि तलाठ्याच्या संगनमताने तालुक्यातील रेती तस्कर या घाटावर उपसा करताना दिसतात. महसूलचे भरारी पथक नावालाचउमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने भरारी पथक तयार केले आहे. या पथकात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि महसूलचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. परंतु या पथकाने आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. कुणी तक्रार केली तर कारवाईचा देखावा केला जातो. सध्या पथक नावालाच असल्याचे बोलले जात आहे.
पैनगंगा नदीतून रेतीचा अवैध उपसा
By admin | Published: May 26, 2017 1:17 AM