फुलसावंगी वनपरिक्षेत्रात वनक्षेत्रपाल जाणीवपूर्वक मुख्यालयी राहात नाही. खसरा मालकाच्या शेत सर्वे नंबरमध्ये प्रत्यक्षात १५ सागवान वृक्ष उभे असताना ९० ते ९५ सागवान वृक्ष दाखवून वृक्षतोड आदेश देतात. नंतर भोगवटदार २ व बाहेरील अवैध वृक्ष तोडून त्या सर्वे नंबरमध्ये आणून ठेवले जातात. त्या सर्वे नंबरमधील फिलिंग पंचनामा करून हॅमरसाठी ते प्रकरण वरिष्ठांकडे पाठविले जाते. तातडीने वाहतूक पास तयार करुन सदर माल बाहेर जिल्ह्यामध्ये खासगी ठेकेदार यांच्या संगनमताने पाठविला जातो.
याच वनक्षेत्रपालाच्या कारकिर्दीत मागीलवेळी एका बिबट्याचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. त्यावेळी तत्कालीन उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पंचनामा करून त्या बिबट्याचे अंत्यसंस्कार केले होते. संबंधित वनक्षेत्रपाल मुख्यालयी राहात नसल्याने वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनसंपदाही चोरी जाण्याची शक्यता बळावली आहे. अशा निष्क्रिय क्षेत्रपालाला वरिष्ठांनी अभय देण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉक्स
गौण खनिजाची चोरीही सुरू
बाहेर जिल्ह्यातील नदीच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक कटरच्या माध्यमातून कटाई करून सागवान कट साइज मालवाहतूक अहोरात्र होत आहे. फुलसावंगी बीटला लागूनच नैसर्गिक अरण्य लाभलेल्या जंगलातून मुरूम, वीटभट्टी वापरासाठी लागणारी माती, दगड यासह विविध गौण खनिजाची संबंधित वनक्षेत्रपाल यांच्या मूक संमतीने दिवसाढवळ्या तस्करी होत आहे.
कोट
याप्रकरणी संबंधित वनपालाला सूचना दिल्या जातील. चौकशीत दोषी आढळल्यास योग्य ती कार्यवाही करू.
अशोक सोनकुसरे, उपवनसंरक्षक, महागाव