मीना अग्रवाल : पुसद तालुक्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती पुसद : डॉक्टर हा समाजाचा घटक असून, तो आता वैद्यकीय व्यवसायासोबतच समाजाचा मार्गदर्शकही झाला आहे. रुग्णांच्या आरोग्यासोबतच सामाजिक स्वास्थ्यासाठी आमचा लढा सुरू असून त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे इंडियन मेडीकल असोसिएशन पुसद शाखेच्या अध्यक्ष डॉ. मीना अग्रवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुसद शहरातील सर्व डॉक्टरांना सामाजिक भान असून समाजाच्या भल्यासाठी डॉक्टरांचा नेहमीच पुढाकर असतो. डॉक्टरांची संघटना असलेल्या आयएमएच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील बदल, अत्याधुनिक माहिती डॉक्टरांना देण्यासोबतच समाजासाठी विविध उपक्रम राबविले जातात. डॉक्टरांसाठी वेबीनार हा उपक्रम राबविला जात असून, नवीन तंत्रज्ञानाची माहिती कार्यशाळा आणि चर्चासत्रातून दिली जाते. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सीपीआर हा उपक्रम राबविला जात असून, त्या माध्यमातून हृदयरुग्णांना माहिती दिली जाते. शाळा, महाविद्यालयात जाऊन तज्ज्ञ डॉक्टर आरोग्याबाबत जनजागृती करतात. तसेच पुसद आयएमएने वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली असून, शहराच्या बाहेर उजाड टेकडीवर वृक्षारोपण केले आहे. जलबचत योजना राबविली जात आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आम्ही कृतीतून करत असून, प्रत्येक डॉक्टरने आपल्या रुग्णालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे, स्वच्छ भारत अभियानासाठीही पुढाकार घेत आहेत. पुसद येथे वॉकेथॉनच्या माध्यमातून अवयवदान आणि देहदान जनजागृती केली जात आहे. अनेक जण यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे येत आहे. आयएमएच्या ‘गाव चले’ मोहीमेंतर्गत जननी सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला आमची डॉक्टर मंडळी ग्रामीण भागात जाऊन मार्गदर्शन करीत असल्याचे डॉ. मीना अग्रवाल यांनी सांगितले. मात्र अलीकडे समाजाचा डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत चालला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ला होण्याच्या घटना घडतात. पुसदही त्याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांसाठी असणाऱ्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. (कार्यालय चमू)
सामाजिक स्वास्थ्यासाठी ‘आयएमए’चा लढा
By admin | Published: February 10, 2017 1:52 AM