लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तसेच मृत्युचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत सुपर स्पेशालिटी आणि स्त्री व नवजात शिशु रुग्णालयात अतिरिक्त ५०० बेडची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. मात्र भविष्यात आणखी बेडची आवश्यकता पडू शकते. शिवाय सदन नागरिक खाजगी रुग्णालयात पैसे खर्च करून उपचार घेण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे आयएमएच्या खाजगी डॉक्टरांनी संपूर्ण जिल्ह्यात किमान ५०० बेड उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
विश्रामगृहात आयएमएच्या डॉक्टरांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी आदी उपस्थित होते.
आयएमएने यवतमाळ शहरात २५० आणि जिल्ह्यात इतरत्र २५० असे किमान ५०० बेडची व्यवस्था करावी, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, समाजातील एका वर्गाची खाजगी रुग्णालयात पैसे देऊन उपचार करण्याची तयारी आहे. त्यामुळे त्यांना उपचार उपलब्ध झाले पाहिजे. खाजगी रुग्णालयात ३० टक्के बेड कोव्हीड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. तसेच खाजगी डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयाव्यतिरिक्त एखादे मोठे मंगल कार्यालय अधिग्रहीत करून तेथे बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन करावे. जेणेकरून कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार करण्यात येईल. मात्र तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. आयएमएसोबत सामंजस्याने तोडगा काढण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यामुळे जबरदस्तीने रुग्णालये अधिग्रहीत करण्याची वेळ येणार नाही, यासाठी आयएमएने सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.यावेळी डॉ. टी.सी. राठोड, डॉ. फडके, डॉ. यावलकर, डॉ. कासारे, डॉ. अग्रवाल यांच्यासह आयएमएचे इतरही सदस्य तसेच पराग पिंगळे, यशवंत पवार आदी उपस्थित होते.