'आघाडीचं सरकार आल्यावर तात्काळ कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 08:03 PM2019-08-21T20:03:58+5:302019-08-21T20:04:48+5:30
मोठमोठ्या कंपन्या बंद होत आहेत. अनेक उद्योग बंद होत आहेत. कामगार बेकार होत आहेत
यवतमाळ - आमचं सरकार आल्यावर तात्काळ कर्जमाफी देवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुसद येथील जाहीर सभेत दिले. हे शेतकऱ्यांचे सरकार नाही तर मुठभर लोकांचे सरकार आहे. सत्तेत असून शिवसेना मोर्चा काढते लोकांना दुधखुळे समजता का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.
या जाहीर सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, कुठल्या दिशेने राज्य चाललंय. वसंतराव नाईक सुधाकर नाईक, शरद पवार यांनी राज्याला दिशा दिली परंतु यांनी राज्य कंगाल करुन टाकले आहे. या सरकारने पाच वर्षांत किती शेतकऱ्यांचे सातबारा कोरा केला ते जाहीर करावे असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी राज्य सरकारला दिले.
मोठमोठ्या कंपन्या बंद होत आहेत. अनेक उद्योग बंद होत आहेत. कामगार बेकार होत आहेत. मात्र वाचाळवीर काहीही बोलत आहेत. राज्यात अस्वस्थता आहे. चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. राज ठाकरे यांची चौकशी होत आहे. पी चिदंबरम यांचीही चौकशी केली जात आहे. चौकशी करा परंतु ज्या पध्दतीचे राजकारण केले जात आहे हे योग्य नाही असंही अजित पवार म्हणाले. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली येथील पुरग्रस्त परिस्थितीला देवेंद्र फडणवीस व येडियुरप्पा यांचे सरकार जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला.
यवतमाळ जिल्हयात सात जागा आहेत तुम्ही त्या निवडून आणू शकता. याअगोदरचा इतिहास मी विसरलो नाही याची आठवण अजित पवारांनी करून दिली. या राज्याला मजबूत, कणखर, शब्द पाळणारं, तरुणांना तसेच अठरापगड जातीतील लोकांना काम देणारं, गोरगरीबांचे, रयतेचे राज्य आणा असं आवाहन अजित पवार यांनी सभेत केले.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. अमोल कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांची कधीच कुणी थट्टा केली नाही एवढी क्रुर थट्टा या भाजप सरकारने केली आहे. सत्ताधाऱ्यांची जनतेशी काय बांधिलकी आहे हे पुरग्रस्त भागातील जनतेला केलेल्या कामावरून लक्षात येत आहे. पीक विम्यात कापूस का नाही तर हेक्टरी ४२ हजार रुपये द्यावे लागतील म्हणून? असा सवाल त्यांनी सरकारला केला. तसेच यापूर्वी एमपीएससीद्वारे नोकर भरती होत होती परंतु आता ७२ हजार मेगाभरती होणार आहे ती मध्यप्रदेशमधील व्यापम घोटाळा केलेल्या त्या कंपनीकडे देण्यात आली आहे. आता काय होणार आहे हे लक्षात घ्या असा इशारा डॉ. अमोल कोल्हे यांनी केला