पालकमंत्र्यांची ग्वाही : वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांसाठी आवश्यक सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्री मदन येरावार यांनी दिली. नवीन अभ्यागत मंडळाच्या गुरूवारी झालेल्या पहिल्या बैठकीत त्यांनी ही ग्वाही दिली. या बैठकीत पालकमंत्री मदन येरावार यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रूग्णांची पहिली पसंती मिळावी, यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. सोबतच रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येक मजल्यावर सीएसआर फंडातून वॉटर एटीएम बसविले जाईल, असे सांगितले. याशिवाय औषधीसाठी मिनी व्हॅन, शवविच्छेदन गृहासाठी मिनी व्हॅन, दोन रूग्णवाहिकेसाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश संबंधितांना दिले. रूग्णालय परिसरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी नगरपरिषदेने ट्रॅक्टरची व्यवस्था करावी, अशी सूचना केली. रूग्णालय परिसरात हायमास्ट लाईटची वयवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत त्यांनी महावितरणच्या संबंधित अभियंत्याला निर्देश देत दोन दिवसांत ही समस्या निकाली काढण्याची तंबी दिली. रूग्णालयातील रिक्त पदांचा अहवाल त्वरित पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले. या बैठकीला अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. अशोक ऊईके, अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, विविध विभाग प्रमुख यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. प्रथम या सर्वांनी रूग्णालयाचा फेरफटका मारून तेथील समस्या जाणून घेतल्या.
अत्यावश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करू
By admin | Published: May 19, 2017 1:52 AM