लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवून आर्थिक मदत देण्याचे नियोजन केले जाईल. त्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ सर्वे करावा, अशा सूचना आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.बाभूळगाव तालुक्यातील मादणी, कृष्णापूर, कोटंबा, नायगाव आदी गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी ना.उईके यांनी केली. यावेळी ते गावकºयांशी संवाद साधत होते. यावेळी शेतकºयांनी कर्जमाफीचे पैसे जमा न होणे, पीक विम्यापासून वंचित राहणे, तुरीचे चुकारे न मिळणे आदी समस्या मांडल्या.या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश ना.डॉ. अशोक उईके यांनी दिले. तत्पूर्वी त्यांनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने पिके हातून जाण्याची वेळ आली आहे. या गावात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, कोतवाल आणि बळीराजा चेतना अभियान समितीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतीचा सोबतच कर्जमाफी, कर्जाचे पुनर्गठन, तुरीचे चुकारे याबाबत पंचनामा करावा, तसा अहवाल २ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकाºयांकडे सुपुर्द करावा, अशा सूचना ना. डॉ. अशोक उईके यांनी याप्रसंगी उपस्थित अधिकारी आदींना केल्या.यावेळी बाभूळगावचे तहसीलदार आनंद देऊळगावकर, गटविकास अधिकारी रमेश दोडके, तालुका कृषी अधिकारी अशोक चव्हाण, लक्ष्मण येलके, मंडळ अधिकारी एस.एन. महिंद्रे, सरपंच सुभाष धोटे, सतीश मानलवार आदी उपस्थित होते.
पावसाअभावी होरपळलेल्या पिकांचा तात्काळ सर्वे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 9:14 PM