त्या दिवशी अमर घरी होता. नंतर तो बाहेर गेला तो परतलाच नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. अमर छोटासा व्यवसाय करायचा. दरम्यान, तो व्यसनाच्या आहारी गेला. मात्र, त्याचे कुणाशीही वैरत्व नव्हते, असे अनेक जण सांगतात. अचानक त्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्यामुळे शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेष म्हणजे आठवडा उलटला तरी त्याच्या मृत्यूबाबत कोणाचीही तक्रार पोलीस ठाण्याला प्राप्त झाली नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत सर्वत्र संशय व्यक्त केला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी महागाव पोलिसांच्या भरवशावर न राहता आपले स्वतःचे नेटवर्क कामी लावलेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपासात मेहनत घेत आहेत. परंतु अद्याप मृत्यूमागील गूढ उकलता आलेले नाही. डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, मृतदेह आढळलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, रात्री १२ वाजेपर्यंत त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांचे जबाब, मोबाइल कॉल डिटेक्शन, यावर सध्या पोलिसांनी तपास केंद्रित केला आहे. शहरात आत्महत्येचा देखावा करून हत्या करण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. शहरातील क्रीडांगण, बस स्थानकाची जागा गुन्हेगारांसाठी नंदनवन ठरत आहे. या दोन्ही ठिकाणी पोलिसांची कोणतीही गस्त राहत नाही. त्याचाच फायदा कट-कारस्थान शिजविण्यासाठी केला जात आहे.