अशोकराव चव्हाण : तळणी येथील प्रचार सभेत केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका आर्णी/तळणी : मोदी सरकारने आकस्मिकपणे नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने राज्यातील विविध शासकीय योजना प्रभावित झाल्या आहे. भाजपा सरकार फसवे सरकार असून खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात आर्णी तालुक्यातील तळणी येथे आयोजित जाहीर सभेत रविवारी केले. अशोकराव चव्हाण म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी इंदिरा आवास योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना, रोजगार हमी योजना प्रभावित झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. अतिवृष्टीचा मोबदलाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. सर्वसामान्यांंना केवळ काँग्रेसनेच न्याय दिला, असे ते म्हणाले. आर्णी तालुक्यातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेण्यात आला होता. परंतु त्याचा काय फायदा झाला असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज्यसभेतील चर्चेच्या वेळीस माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी काँग्रेसमध्ये लाभाचे पद भोगून पक्ष सोडून गेलेल्यांना आपली जागा दाखविण्याचे आवाहन केले. तर माजी मंत्री अनिस अहमद म्हणाले, काँग्रेसच्या काळात राबविलेल्या योजनांमुळे सर्वसामान्यांचा विकास झाला. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने गोरगरिबांचा विकास केला असून त्यांंना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार भाई जगताप यांनी भाजपा सरकारच्या काळात शेतमालाला योग्य भाव मिळत नसून शेतकऱ्यांना कर्ज फेडणे कठीण झाल्याचे सांगितले. सरकारने जनतेची फसवणूक केली असून विकासासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले. या सभेला साजीद बेग, शाहीद रयाणी, जीवन पाटील, सतीश हिराणी, राजू विरखेडे, सुनील भारती, प्रदीप वानखेडे यांच्यासह आर्णी तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. संचालन आरिज बेग यांनी तर आभार अनिल आडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
नोटाबंदीने शासकीय योजना प्रभावित
By admin | Published: February 13, 2017 1:11 AM