ग्रामीण भागात विहिरी, नद्या, नाले, हातपंपाद्वारे गावकरी आपली तहान भागवतात. जनतेला शुद्ध पाणी पोहोचविणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. परंतु प्रशासनातर्फे त्यांची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे स्वच्छ पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे म्हणून अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या. परंतु या योजनांचा राबविल्या जात नसल्याने ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. तालुक्यात अनेक गावांत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. हातपंप, सार्वजनिक विहिरी, बोअरवेलमधून ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. पाणी पिण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, यासाठी पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे आवश्यक आहे. तशा प्रशासनाच्या सूचना असतात. परंतु या सूचनेकडे गंभीरतेने पाहिले जात नाही. स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. पाणी अशुद्ध आहे, हे माहीत असूनही बरेचदा पाण्याचे दुसरे स्त्रोत उपलब्ध नसल्याने त्याच पाण्याचा पुरवठा केला जातो. अनेक गावांत फ्लोराईडयुक्त पाणी असून ते पिण्यास अयोग्य आहे. तरीही ग्रामस्थांना तेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे अनेकांना हाडाचे आजार झाले आहे. तालुक्यातील काही गावांत पिण्याचे पाण्याचे नियोजन अतिशय चांगले असल्याचेही दिसून येते. वॉटर फिल्टर लावून नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास उपलब्ध करून दिल्याचेही उदाहरण काही गावात दिसून येते. परंतु अशा गावांची संख्या फार जास्त नाही.
पांढरकवडा तालुक्यात अशुद्ध पाणीपुरवठा, आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायतीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:41 AM