यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात यवतमाळ जिल्ह्याचा टक्का घसरला असून यंदा जिल्ह्यातील ९१.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी ९६.३१ टक्के निकाल लागला होता. त्यादृष्टीने यंदा पाच टक्क्यांनी घसरण झाली आहे.
यावर्षी जिल्ह्यातील ३६ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. शुक्रवारी हाती आलेल्या निकालानुसार यातील ३३ हजार २१ विद्यार्थ्यांनी बाजी मारत दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे यंदा ७ हजार ८५९ एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. तर १२ हजार ४८१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ९०४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. मात्र २ हजार ७७८ विद्यार्थ्यांना जेमतेम पासिंगपुरते गुण मिळविता आलेले आहेत.
विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी अमरावती विभागातून शेवटचा क्रमांक मिळाला आहे. गेल्या वर्षी ९६ टक्के निकाल लागूनही यवतमाळ ढांग ठरला होता. तर यंदा ९१.४९ टक्के अशी निकालाची घसरण होत विभागातून शेवटचा क्रमांक यवतमाळच्या वाट्याला आला आहे.
जिल्ह्यात यंदा नेर तालुक्याने दहावीच्या निकालात पहिला क्रमांक पटकावला आहे. नेर तालुक्याचा ९४.९४ टक्के निकाल आला आहे. त्याखालोखाल यवतमाळ ९३.०८, पुसद ९३.०५, मारेगाव ९२.९७, आर्णी ९१.९६, घाटंजी ९१.८६, महागाव ९१.७३, दारव्हा ९१.४३, पांढरकवडा ९०.७९, दिग्रस ९०.४१, बाभूळगाव ९०.०१, उमरखेड ९०, वणी ८९.९७, झरी ८९.६२, कळंब ८९.०९, तर राळेगाव तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८७.४७ टक्के लागला आहे.