संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : बुधवारी मारेगाव तालुक्यात झालेल्या वादळी पावसात खैरगाव (भेदी) येथील १३ घरांवरील छत उडाले. यामुळे घरातील अन्नधान्यासह संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.
गेल्या एक महिन्यापासून तालुक्यात वादळी पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतीची कामे खोळंबली आहेत. अशातच बुधवारी २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास जोरदार वादळ व पाऊस झाला. यात अनेक गावांत मोठे नुकसान झाले. मारेगाव तालुक्यातील खैरगाव (भेदी) या गावातील १३ घरांवरील छत उडून गेल्याने कपडे, धान्य व इतर वस्तू ओल्या होऊन मोठे नुकसान झाले.
घरावरील छत उडालेल्या नुकसानग्रस्तामध्ये रवी आत्राम, अशोक मडावी, सुहास जाधव, विलास टेकाम, सेवादास चव्हाण, लक्ष्मीबाई टेकाम, रामा आत्राम, गुलाब आत्राम, अमोल पवार, योगेश आत्राम, रामकृष्ण टेकाम, तानबाजी चौधरी, परमेश्वर मेश्राम या नागरिकांचा समावेश आहे. महसूल प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे केले जात असल्याची माहिती तहसीलदार दीपक पुंडे यांनी दिली.