यवतमाळ : जिवावर उदार होऊन काम करीत असलेल्या कंत्राटी वीज कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वीज कंपनीकडून किंवा सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर येते. यवतमाळ जिल्ह्यात मागील आठवड्यात घडलेल्या अशा दोन घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
वीज कंपनीत रिक्त असलेल्या रिक्त जागांवर ऑपरेटर आणि तंत्रज्ञांची नियुक्ती केली जाते. बाह्यस्रोतांकडून त्यांची भरती होते. दरमहा त्यांना १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. त्यांच्याकडून जोखमीची कामे करून घेतली जातात. परंतु, आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाही. कायम वीज कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडून कामे करून घेणे अपेक्षित असतानाच एकट्यालाच खांबांवर चढून त्यांना कामे करावी लागतात.
अशावेळी अपघात झाल्यास त्यांना विदुयत कंपनी अथवा कंत्राटदाराकडून कुठलीही आर्थिक मदत दिली जात नाही. त्यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या पीएफच्या रकमेवर जे काही व्याज मिळेल, तेवढीच रक्कम त्यांच्या कुटुंबाला मिळते. नोकरीचा कालावधी पाहून पाच ते बारा हजारांपर्यंत ही रक्कम कुटुंबाला मिळते. शुक्रवारी सिरसगाव पांढरी (ता. नेर) येथे वीज खांबावरच पंकज करडे (रा. खरडगाव) याचा शॉक लागून मृत्यू झाला. याच दिवशी आमटी (ता. पुसद) येथे वीज खांब अंगावर पडून लक्ष्मण पवार या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. या दोघांचेही कुटुंब उघड्यावर आले आहे.
हे तर... वरिष्ठांच्या निष्काळजीपणाचे बळी
कर्मचाऱ्याने वीज दुरुस्तीसाठी जाताना विद्युत केंद्रात असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते. तशी सूचना तेथे कार्यरत कर्मचाऱ्याला द्यावी लागते. काम झाल्याची सूचना मिळाल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करू नये, असे बजावले जाते. परंतु, काम सुरू होण्यापूर्वीच वीजपुरवठा सुरू केला जातो. यात प्रत्यक्ष काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याचा बळी जातो. कामातील निष्काळजीपणा या घटनांना कारणीभूत असल्याचे अनेक घटनांवरून पुढे आले आहे.