६३ शाळांचा समावेश : जिल्ह्यातील ३५० खेळाडूंचा सहभाग यवतमाळ : दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन रविवारी येथील नेहरू स्टेडियमवर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते झाले. २३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील ६३ दिव्यांग शाळेतील ३५० खेळाडू सहभागी झाले आहेत. अपंग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, समाज कल्याण अधिकारी जया राऊत, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी आदी उपस्थित होते. खेळाडूंनी सर्वप्रथम संचलनाव्दारे मान्यवरांना मानवंदना दिली. उमरखेड येथील आंतरराष्ट्रीय अंध खेळाडू पूनम इटकरे हिने धावत येऊन पाहुण्यांना क्रीडाज्योत दिली. दिव्यांग खेळाडुंमध्ये मानसिक शक्तीचे बळ सर्वसामान्यांपेक्षा जास्त असते. या बळाचा वापर त्यांनी प्रगतीसाठी करावा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या सेस निधीचा वापर क्रीडा स्पर्धांसाठी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सीईओ दीपक सिंगला यांनी मार्गदर्शन केले. पूनम इटकरे, मोहदा येथील राष्ट्रीय खेळाडू पूजा उईके यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संचालन जितेंद्र सातपुते, प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी जया राऊत यांनी केले. (क्रीडा प्रतिनिधी)
दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
By admin | Published: January 23, 2017 1:06 AM