दारव्हा : नगर परिषदेने येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक सभागृह बांधून दिले. या सभागृहाचे उद्घाटन आमदार संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बबनराव इरवे होते. उपाध्यक्ष प्रीती बलखंडे, मुख्याधिकारी धीरज गोहाड, बांधकाम सभापती अरविंद निंबर्ते, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी संजय राठोड यांनी २००३ मध्ये मंडळाची स्थापना झाली. परंतु उपक्रमासाठी योग्य स्थळ नसल्याने ज्येष्ठांची गैरसोय होत होती. आता हक्काचे सभागृह मिळाल्याने ज्येष्ठांनी आनंदी जीवन जगावे, तणावमुक्त राहावे, असे आवाहन केले. त्यांनी मंडळाला १०० शंभर खुर्च्या व खेळाचे साहित्य देण्याचे आश्वासन दिले.
मंडळाचे पहिले अध्यक्ष वसंतराव मांडेकर, किशोरीलाल डागा, प्रा. राजेंद्र ठाकूर, साहेबराव कांबळे यांनीही विचार मांडले. यावेळी मंडळाला देणगी देणाऱ्या प्रभाकर शिनगारे, वयोवृद्ध सभासद रामेश्वर पंडित यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. संचालन शिवाजी खडसे, प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष ना.म. जवळकर तर आभार बापूराव तायडे यांनी मानले. तुकाराम इंगळे, ओंकार देशकरी, कृष्णराव अर्धापूरकर आदींनी परिश्रम घेतले.