शेतकरी चिंतेत : कृषी विभागाने केले उपविभात सर्वेक्षण, फवारणीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन पांढरकवडा : उपविभागात सोयाबीन या पिकावर उंट अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाला आहे. कृषी उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरीजामणी या चारही तालुक्यात कृषी विभागाच्या कीड रोग सर्वेक्षण व कीड नियंत्रक सल्ला प्रकल्पामार्फत चमूने केलेल्या सर्व्हेक्षणात काढण्यात आले. या सर्व्हेक्षणानुसार सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाल्याचे आढळून आले. उंट अळी हिरव्या रंगाची असून चालताना पाठीवर उंटासारखा बाक तयार करते. ही अळी सोयाबीनची कोवळी पाने शिरासहित कुरतडून खातात व शेंगांना छिद्र करून त्यातील दाणे खातात. परिणामी उत्पादनात मोठी घट होते व शेतकऱ्याांना आर्थिक फटका बसतो. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सोयाबीन पिकाच्या प्रत्येक ओळीत प्रत्येक एक क्षेत्र मीटरवर ३-४ अळ्या आढळून आल्या. पाच टक्के निंबोळा अर्क किंवा बिव्होरीया ४० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात फिरवून फवारणी केल्यास उंट अळीचा प्रादूर्भाव कमी होतो, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली. शेतकऱ्यांनी वेळीच ही फवारणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पक्षांना बसण्यासाठी शेतात १५ ते २० पक्षी थांबे लावावेत. सोबतच प्रकाश सापळ्यांचा नियंत्रित उपयोग करून किडींचे पतंग पकडून नष्ट करावे. तर पतंगांना आकर्षित करण्याकरिता शेतात हेक्टरी १० कामगंध सापळे लावावे. त्यामध्ये आकर्षित झालेल्या नर पतंगांना पकडून नष्ट करावे. तसेच पाताखाली असलेली अंडीपूज व अळी शोधून नष्ट करावी, असे आवाहनही सातपुते यांनी केले आहे. या अळीचा प्रादूर्भाव जास्तच आढळून आल्यास फेनवेलरेट २० इ.सी. ७ मिनीलीटर किंवा क्लिनॉकपॉस २५ इ.मी.२० मीलीलीटर किंवा प्रोफेनोपॉस ५० इसी १५ मीली लीटर किंवा क्लोरोपायथीपॉस २० इसी २० लीटर पाण्यात किंवा इलेक्टीन बेझॉईट एस.पी.पाच ग्रॅम किंवा सिनोसॅड पाच एस.पी.४ ग्रॅम किंवा इंडोक्सीकार्य १० मीली प्रति १० लीटर पाण्यात वरील कोणतेही एक औषध मिसळून फवारणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. धुऱ्यावरील गवत ८-१० दिवस जनावरांना खाऊ देऊ नये. आवश्यकता भासल्यास पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी, असे आवाहनही राहुल सातपुते यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
पांढरकवडा तालुक्यात सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव
By admin | Published: August 14, 2016 12:54 AM