लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरिपाच्या तुलनेत रबी आणि उन्हाळी पिके घेण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी या पिकामधून प्रयत्न होतो. मात्र, जंगली जनावरे, वीज भारनियमन आणि चांगला भाव न मिळणे या प्रमुख कारणाने तेलबियांच्या क्षेत्रात जिल्ह्यात घट झाली आहे. रबी हंगाम आणि उन्हाळ्यात करडई, सूर्यफुल, भुईमूग, तीळ आणि मोहरी ही प्रमुख पिके घेतली जातात. विविध अडचणी निर्माण झाल्याने करडई आणि सूर्यफुल दोन्ही पिके नाहीशी झाली आहेत. आता मोहरी, तीळ आणि भुईमूग या पिकांना पहिली पसंती आहे. ही पिके घेताना भुईमुगावर सर्वाधिक भर आहे. मात्र, जंगली जनावरांना हे पीक सर्वाधिक आवडीचे आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कितीही सुरक्षा केली तरी रानडुकर या शेतामध्ये प्रवेश करतात. संपूर्ण शेतच उद्ध्वस्त करतात. लावलेला खर्चही निघत नाही. याला पर्याय म्हणून शेतकरी रबीच्या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. गहू, हरभरा या पिकांच्या माध्यमातून शेतात उत्पादन काढण्यासाठी त्यांचा सर्वाधिक भर आहे. तर, उन्हाळी पिकामध्ये तेलबियांसाठी पाहिजे त्या प्रमाणात लागवड होत नाही. उन्हाळ्यात पाणी पुरेल किंवा नाही याचाही प्रश्न अनेकांकडे असतो. शिवाय, इतरत्र पीक नसल्याने उन्हाळ्यात हिरवळ असणाऱ्या भागात वन्यप्राण्यांचा आणि मोकाट जनावरांचा धुमाकूळ असतो. यातून तेलबियांचे क्षेत्र कमी झाले आहे.
जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकरी पीक घेण्यासाठी तयार आहेत. मात्र, वन्यप्राण्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे तेलबिया पेरताना शेतकरी आखडता हात घेतात. तेलबियांचा उत्पादनखर्चही वाढला आहे. मिळणारा भाव कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर रबीच्या पिकाकडे वाढला आहे. यातूनच जिल्ह्यातील तेलबियांचे क्षेत्र घटले आहे.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ
करडई, सूर्यफुल हद्दपारतेलबिया म्हणून करडईची पूर्वी मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. हे पीक काढणी करताना अतिशय जोखमीचे आहे. यामध्ये हाताला इजा होते. अलीकडे मजुरांना सुविधा असेल तरच कामावर जाण्याची परंपरा वाढली आहे. यामुळे करडईचे पीक कालबाह्य झाले आहे. तर सूर्यफुल पिकावर पक्ष्यांचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होते. खाण्यासाठी अन्न म्हणून पक्षी मोठ्या प्रमाणात या शेतशिवारात शिरतात. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो. या पिकाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यामुळे तेलबियांचे वाण म्हणून ओळखले जाणारे ही दोनही पिके जिल्ह्यातून हद्दपार झाली आहेत.
तेलबिया लागवड करताना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धोका वाढला आहे. याशिवाय भारनियमनाचाही प्रश्न आहे. यामुळे पाणी उपलब्ध असले तरी ओलीत करता येत नाही. याशिवाय शेतमालास चांगला दरही मिळत नाही. तेलबियांचे पीक घेताना रात्री जागल करावी लागते. जंगली जनावरे रखवाली करणाऱ्यांवर धावून येतात. यामुळे शेतकऱ्यांनी तेलबियांचे पीक कमी केले आहे.- मनीष जाधव, शेतकरी, महागाव