सन १९९७ मध्ये मारेगाव येथे आदिवासी शासकीय आयटीआयची स्थापना झाली. तेव्हा मारेगाव तालुक्यात झरी तालुक्यातील गावांचा समावेश होता. त्यामुळे तालुक्यात आदिवासी समाजाची मोठी संख्या लक्षात घेता, मारेगाव येथे राज्य शासनाने आदिवासी शासकीय आयटीआयची स्थापना केली; परंतु सन १९९७ मध्ये मारेगाव तालुक्यातून झरीजामणी तालुका वेगळा झाला. झरी तालुक्यात आदिवासी समाजाची संख्या मोठी असतानाही झरी येथे सन १९९९ मध्ये जनरल आयटीआयची स्थापना केली, तर दुसरीकडे मारेगाव येथील आदिवासी शासकीय आयटीआय कायम ठेवण्यात आला. सध्या मारेगाव येथील आयटीआयमधील उपलब्ध असलेल्या जागापैकी ७५ टक्के जागा या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, तर उर्वरीित २५ टक्के जागा एस.सी, एन.टी, व्हीजे, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी राखीव आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर प्रवर्गातील विद्यार्थी शासकीय आयटीआयच्या प्रवेशापासून वंचित राहतात. सध्या रोजगार मिळविण्यासाठी आयटीआयचे महत्त्व वाढले असून विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेशाकडे कल वाढला आहे. तालुक्यातील आयटीआयच्या जागा राखीव विद्यार्थ्यांसाठी जास्त असल्याने सामान्य विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर समाजातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, येथील शासकीय आयटीआयमध्ये सामान्य विद्यार्थ्यांसाठी जास्तीच्या जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
आयटीआयच्या जागा सामान्य विद्यार्थ्यांसाठी वाढवा, सामान्य विद्यार्थी वंचित : ७५ टक्के जागा आदिवासींसाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:43 AM