पुसद/उमरखेड : हैदराबादमधून आणलेला जिवंत काडतुसांचा साठा पुसदमधील इम्तियाज खॉ सरदार खॉ (२५) रा. पार्वतीनगर याच्याकडे जात होता, अशी कबुली आरोपींनी दिल्यानंतर पोलिसांनी सोमवारी इम्तियाजच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात तांब्याचे एक जिवंत काडतूस (रायफल राऊंड), काळ्या व पांढऱ्या धातूचा चाकू, सिल्वर (गन) पावडर १० ग्रॅम, भाल्याचे पाते, ४० ग्रॅम कथील, कोरे जन्म प्रमाणपत्र, अपंगाचे ओळखपत्र, रत्नाकर सोनबा भामकर या नावाचे ओळखपत्र, चार मोबाईल हॅन्डसेंट, विविध कार्यालयाचे सील व पॅड व शिक्के, काहींचे शस्त्रे परवाने आदी साहित्य सापडल्याची माहिती दराटीचे ठाणेदार सागर इंगोले यांनी ‘लोकमत’ला दिली. फौजदार शिवाजी बोरकर यांच्या तक्रारीवरून इम्तियाज याच्याविरुद्ध पुसद पोलीस ठाण्यात भादंवि ४७२, ४७५ तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३/२५, ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. इम्तियाज फरार आहे. दरम्यान दराटी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोहंमद मशियोद्दीन ओवैशी (३५), मोहंदम उमर गाझी (२७) आणि मो.मिबाजोद्दीन निजामोद्दीन (२२) या हैदराबादच्या तीनही आरोपींना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी उमरखेड येथे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एम.के. शेख यांच्यापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत ९ जानेवारीपर्यंत वाढ केली. या तीनही आरोपींना ३१ डिसेंबरच्या रात्री दराटी पोलिसांनी ६० जिवंत काडतुसांसह खरबीत अटक केली होती. (प्रतिनिधी)
तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत ९ पर्यंत वाढ
By admin | Published: January 06, 2016 3:04 AM