कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी येथील व्यापाऱ्यांची बैठक घेत स्वतः पुढे येऊन दुकान मालक व दुकानातील कामगारांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले होते. तहसीलदारांच्या आदेशानुसार १७ मार्चपासून कोरोना चाचण्या सुरू झाल्या. त्यात दोन दिवसांत २००पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी चाचणी केली. त्यापैकी २४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. विशेष म्हणजे त्यांच्यात कोणतेही लक्षण नाही. तरीही वाढत्या रुग्ण संख्येने ढाणकीत भीतीचे वातावरण आहे.
गेल्यावर्षी ढाणकीत एकच पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. तेव्हा नगरपंचायत प्रशासनाने खंबीर पावले उचलत कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, यावर्षी २४ रुग्ण आढळूनही नगरपंचायत कोणताही प्रयत्न करीत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
अजून बऱ्याच व्यापाऱ्यांची चाचणी बाकी आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे व्यापाऱ्यांमध्येसुद्धा चिंता वाढत आहे. रुग्ण वाढले तर मार्केट बंद होईल, अशी भीती त्यांना सतावत आहे.
बॉक्स
पहिल्या रुग्णानेच दिली माहिती
चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या पहिल्या रुग्णाने स्वतःहून मोबाईलद्वारे आपण पॉझिटिव्ह असल्याचे नागरिकांना सांगितले. तसेच संपर्कातील व्यक्तींनी स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले. त्यांची ही जागरूकता कौतुकाचा विषय ठरली. मात्र, किती व्यक्तींनी स्वतःची चाचणी केली आणि किती जणांनी नाही केली, याची नगरपंचायतीकडे नोंद आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.