डीएमईआरच्या सूचना : १६ अधिष्ठात्यांना पत्र सुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील संशोधनाचे काम जवळपास ठप्प पडल्याने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) राज्यातील सोळाही वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना सूचनापत्र देऊन स्वतंत्र संशोधन विभाग निर्माण करण्यास सांगितले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचा मूळ हेतू डॉक्टर्स तयार करण्यासोबतच संशोधन कार्य करणे हा आहे. संशोधन कार्याकडे सर्वच महाविद्यालयांचे विभागप्रमुख व सहयोगी प्राध्यापकांकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासकीय महाविद्यालयांमध्ये दर्जेदार रिसर्च पेपर प्रसिद्ध होत नाही. यामुळे वैद्यकीय सेवेचा दर्जाही एका मर्यादा पलिकडे सुधारलेला नाही. डीएमईआरकडून वैद्यकीय संशोधनासाठी अत्यावश्यक सुविधा दिल्या जातात. संशोधनपर कार्याकरिता शासनाचे अनुदान उपलब्ध करून घेण्यासाठी महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र संशोधन विभाग साकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. यात ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, बै.जी. वैद्यकीय महाविद्यालय पुणे, वैश्यंपायन स्मृती महाविद्यालय सोलापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मीरज, रा. छ. शा. म. महाविद्यालय कोल्हापूर, भाऊसाहेब हिरे महाविद्यालय धुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, स्वामी रामानंदतीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई, लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या महाविद्यालयांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ एमसीआयच्या (भारतीय आयुर्विज्ञान परिषद) निकषांची पूर्तता करण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आलेले रिसर्च पेपर्सच दाखविले जातात. ही प्रथा बंद करून खऱ्या अर्थाने संशोधन विभाग कार्यान्वित करण्यासाठी डीएमईआरकडून पाठपुरावा केला जात आहे. याला वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग किती प्रतिसाद देतो हे महत्वाचे ठरणार आहे. पदोन्नतीसाठी सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांना संशोधन करणे आवश्यक आहे. मोठ्या जर्नलमध्येच प्रसिद्ध झालेले संशोधन ग्राह्य धरले जाते. पूर्वी केस रिपोर्टवरूनच काम चालत होते. आता ‘एमसीआय’ने कठोर निर्देश दिले असून ‘डीएमईआर’नेही त्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. आता आॅनलाईन जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध करण्याची सुविधा उपलब्ध आहे. - डॉ. अशोक राठोड, अधिष्ठाता, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ
मेडिकलमध्ये संशोधनासाठी स्वतंत्र विभाग
By admin | Published: June 29, 2017 12:10 AM