यवतमाळ : बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान यवतमाळातील मारवाडी चौकात गालबोट लागले. यावेळी आंदोलकांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितल्याने वाद निर्माण होऊन तणाव वाढला. या आक्रमक आंदोलकांपासून बचाव करण्यासाठी एका मिरची विक्रेत्या व्यापारी कुटुंबाने मिरची पावडर फेकली. त्यामुळे काही काळ तणाव वाढला होता. यावेळी व्यापाऱ्यांनी ‘मोदी मोदी’च्या घोषणा दिल्या.
आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी आले असता केवळ दोन पोलीस त्या भागात तैनात असल्याने त्यांच्यावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. त्यानंतर यवतमाळ शहरचे ठाणेदार धनंजय सायरे हे अतिरिक्त कुमक घेऊन तेथे दाखल झाले व त्यांनी आंदोलकांना पिटाळून लावले. त्याच भागात शुक्रवारी महाराष्ट्र बंद दरम्यानही गालबोट लागले होते. त्यावेळी बंद समर्थक व विरोधक आमनेसामने उभे ठाकले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात बुधवारच्या भारत बंदला यवतमाळ शहर व जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरूच ठेवली. त्यामुळे आंदोलक ही दुकाने बंद करण्यासाठी व्यापारपेठेत पोहोचली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. व्यापारी व आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी दुकानातील साहित्य फेकणे, मारहाण असे प्रकारही घडल्याचे सांगितले जाते.