लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : दोन वर्षांपूर्वीच येथे ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीचे काम पूर्णत्वास गेले होते. तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही इमारत रुग्णांच्या उपयोगात येण्याकरिता नागरिकांकडून प्रतीक्षा केली जात होती. पण आरोग्य विभाग, शासनातील जनप्रतिनिधींच्या अनुत्साहामुळे आता हे रुग्णालय सुरूच होणार नसल्याचे संकेत दिसू लागले आहे. ट्रामा केअरच्या इमारतीत ग्रामीण रुग्णांचे बहुतांश विभाग मागील महिन्यात स्थानांतरीत झाले आहे. राळेगाव या आदिवासी मागास भागातील रुग्णांची गरज ओळखून येथे ट्रामा केअर सेंटर उघडण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार कोट्यवधी रुपयांची सुंदर व सर्व सुविधायुक्त इमारत येथे उभी राहिली. युती शासन काळात पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार पदभरतीकरिता आवश्यक त्या विभागाकडून परवानगी घेऊन जाहिरातही काढण्यात आली होती. पण अस्थिशल्य विशारद (आर्थोपेडीक तज्ज्ञ) राळेगावसारख्या ठिकाणी शासनाच्या तोकड्या पगारावर येण्यास तयार नसल्याने आता हे रुग्णालय होणारच नाही, असे चित्र दिसू लागले आहे. ६०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते राळेगावच्या सर्व बाजूने झाले असल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आल्याने स्थानिक सोबत आंतरराज्यीय वाहतूक येथे दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर अपघातांची संख्याही लक्षणीयरित्या वाढली. या परिस्थितीत येथे ट्रामा केअर सेंटर स्थापन होणे आणि प्रत्यक्ष सुरू होण्याची नितांत गरज आहे. आघाडी सरकारमधील लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षाचे स्थानिक आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांनी ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यास प्रतिष्ठेचा प्रश्न करून आवाज उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. ट्रामा केअर संदर्भात लोकप्रतिनिधी आणि संघटना कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
उपजिल्हा रुग्णालयाची गरज राळेगाव येथे ग्रामीण रुग्णालय २४ वर्षांपूर्वी सुरू झाले. त्यानंतर आरोग्य सेवेचा येथे विस्तार झालेला नाही. रुग्णालयातील पदांची संख्या, डॉक्टरांची संख्या, बेडची संख्या वाढविण्यात आली नाही. वाढती लोकसंख्या पाहता राळेगाव येथे ग्रामीण रुग्णालयाचे अपग्रेडेशन करून उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याची आणि सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. १५ वर्षांपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी अशीच सूचना येथे एका कार्यक्रम प्रसंगी आरोग्य विभागाला केली होती. तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. पण यापुढे याबाबतीत काहीच झाले नाही. त्यामुळे आरोग्य सेवेसाठी नागरिकांना जवळच्या शहरात पैसा, वेळ खर्चून हेलपाटे मारावे लागतात. आर्थिक, मानिसक त्रास सहन करावा लागतो.
ट्रामा केअर सेंटरसाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध होवू शकला नाही. ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर या दोनही ठिकाणाहून रुग्णसेवा सुरू राहील. कुठल्याही परिस्थितीत ट्रामा केअर सेंटर रद्द होऊ देणार नाही. - प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार, राळेगाव