महागाव नगरपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 03:58 PM2021-12-14T15:58:43+5:302021-12-14T16:13:07+5:30
ओबीसी आरक्षणाचे चार प्रभागांतील निवडणूक स्थगित झाल्यानंतर उर्वरित १३ प्रभागांमध्ये नगरपंचायतीची निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत आहे.
यवतमाळ : ओबीसी आरक्षणाचे चार प्रभागांतील निवडणूक स्थगित झाल्यानंतर उर्वरित १३ प्रभागांमध्ये नगरपंचायतीची निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत आहे. आरक्षणाच्या जागेवर उमेदवार शोधताना राजकीय पक्षांची धावपळ होऊन बहुतांश ठिकाणी योग्य उमेदवार मिळाले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना प्रकर्षाने समोर आली आहे.
काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे. कुठे दुहेरी, तर कुठे तिरंगी लढत आहे. मागील वेळी परिवर्तन पॅनलच्या नावाखाली सर्वाधिक नऊ जागा मिळविल्या होत्या. कालांतराने परिवर्तनचे विलीनीकरण शिवसेनेत झाले. आता त्यात अन्य पक्षांतील काही चेहरे दाखल झाले आहे. सुरुवातीला परिवर्तनची सत्ता होती. नंतर त्यातील काहींनी अन्य पक्षात आश्रय घेतला. भाजपला एक जागा मिळूनही काॅंग्रेसच्या सहकार्याने नगराध्यक्षपद मिळाले होते. आता भाजप पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला उतरला आहे. भाजपला उत्तर देण्यासाठी काॅंग्रेसनेही कंबर कसली आहे.
यापूर्वी काॅंग्रेसने पाच जागा जिंकल्या होत्या. त्या कायम ठेवण्यासाठी पक्षाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. सत्तेत सहभागी असलेल्या काॅंग्रेसने या ठिकाणी विकास कामातून, घनकचऱ्यातून पाच वर्षात केवळ बदनामीचे डाग अंगावर लावून घेतले. विरुद्ध पक्षाच्या वतीने याबाबत सोशल मीडियात प्रचारही सुरू झाला आहे. पाच वर्षात विस्मरणात गेलेली राष्ट्रवादी काॅंग्रेस दोन प्रभागात उमेदवार देऊ शकली नाही. मागच्या निवडणुकीत त्यांना एक जागा मिळाली होती. इतर सर्व उमेदवार तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते.
परिवर्तनची आता शिवसेना झालेली असल्यामुळे आजवर डावात नसलेली सेना, उमेदवार निश्चितीनंतर स्पर्धेत आली आहे. चारही प्रमुख पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
काका-पुतण्याच्या लढाईत प्रभाग १६ प्रतिष्ठेचा
प्रभाग क्र. १६ हा काॅंग्रेस व भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेचा बनला आहे. या ठिकाणी काका-पुतण्याच्या लढाईमध्ये अन्य पक्षांनी उमेदवार दिले नाही. त्यावरून या प्रभागात काका-पुतण्याची लढाई कोणत्या टोकाला जाईल हे निवडणुकीचा निकालच सांगणार आहे. या प्रभागात काॅंग्रेसचा पराभव झाल्यास त्याचा प्रभाव इतरही प्रभागांमध्ये पहायला मिळणार आहे. त्यातून मागील वेळी केवळ एकच सदस्य असलेले भाजप आपले खाते वाढवू शकणार आहे.