१२वायटीपीएच०१
दारव्हा (यवतमाळ) : राज्यातील महाविद्यालयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन उच्च शिक्षणमंत्र्यांनी संबंधितांना दिले. त्यामुळे हे प्रश्न सुटण्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीत समस्यांबाबत त्यांना अवगत करण्यात आले. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी सांगितले.
उच्च शिक्षणातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी भरती, वेतनेतर अनुदान, त्याचबरोबर प्राध्यापकांचे शासनास्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्राध्यापकांना कॅस योजना पात्रतेच्या दिनांकापासून लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना, सर्व प्राचार्यांना सरसकट प्रोफेसर श्रेणी लागू करणे आदी प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर उच्च शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मुंबईत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, विदर्भ संस्था संचालक संघाचे सचिव मोहन पावडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.