लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रशासनाने लॉकडाऊनमुळे बंद पडलेले एमआयडीसीतील उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली असली तरी उद्योजकांना मजूर, कच्चामाल, वाहनांची परवानगी अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.यवतमाळच्या एमआयडीसीत भूखंड खरेदी केलेल्या २५० उद्योजकांची नोंद आहे. त्यापैकी १३० भूखंडावर प्रत्यक्ष उद्योग उभारले गेले. लॉकडाऊनपूर्वी यातील ६० ते ७० उद्योग सुरू होते. लॉकडाऊनच्या काळात फुड, बेकरी, कृषीवर आधारित, दालमिल, जिनिंग-प्रेसिंग या सारखे अत्यावश्यक सेवेतील उद्योग तेवढे सुरू होते. परंतु आता प्रशासनाने इतरही उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळीच येथील एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना उद्योग सुरू करण्याच्या सूचना उद्योजकांना देण्याचे निर्देश दिले. मास्क वाटप, सॅनिटायझरींग, सोशल डिस्टन्सिंग अशा अटींवर हे उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. एमआयडीसीने पोर्टल विकसित केले असून त्यावर आॅनलाईन पद्धतीने ही परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी उद्योजकाला कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून करावयाच्या आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची हमी द्यावी लागणार आहे.प्रशासनाने लॉकडाऊन काळातही उद्योग सुरू करण्याची मुभा दिली असली तरी लगेच उद्योजकांना कारखाने सुरू करण्यात अडचणी येत आहेत. कुशल व अकुशल कारागीर-मजुरांची टंचाई ही प्रमुख समस्या उद्योजकांपुढे आहे. शिवाय कच्चामाल मिळविणे, तयार मालाची वाहतूक करणे या समस्याही कायम आहेत. आरटीओकडून माल वाहतुकीच्या परवानगी दिल्या जातात. त्या तातडीने मिळाव्या अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. त्यामुळे तयार माल बाहेर जिल्ह्यात, राज्यात पाठविण्याची अडचण दूर होईल. रेमण्ड सारखा उद्योग सध्या बंद आहे. आधीच तयार असलेला माल पडून आहे. मालाला उठाव नसणे ही प्रमुख समस्या आहे. रेमण्डचा माल निर्यात होतो, त्यासाठी हा माल मुंबईत कोस्टलपर्यंत पोहोचवायचा कसा याची अडचण आहे. आधीचाच तयार माल पडून असताना पुन्हा उत्पादन करायचे कसे ही समस्या आहे. त्यातही तीन शिप्ट असल्याने कोरोनाची दक्षता घेण्याचे आव्हान वेगळेच.लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योगांना कारखाने सुरू करण्याची मुभा प्रशासनाकडून दिली जाणार आहे. सशर्त आॅनलाईन परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योजकांनी पुढे येणे गरजेचे आहे.- हेमंत कुळकर्णी, उपअभियंता, एमआयडीसी यवतमाळ.उद्योग सुरू करण्यास अनेक अडचणी आहे. उद्योग सुरू झाल्यानंतर कोरोनाचा रुग्ण सापडल्यास थेट एफआयआर होणार असल्याने उद्योजक कारखाने सुरू करण्यास धजावत नाहीत. नियम-कायदे कठीण असल्याने शिवाय मजूर, कच्चामाल, वाहतूक परवानगी या अडचणी असल्याने उद्योग सुरू करणे आव्हानच आहे.- आनंद भुसारी, सचिव, एमआयडीसी असोसिएशन, यवतमाळ.
उद्योगांना परवानगी पण मजूर, कच्चामाल, वाहतुकीची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 5:00 AM
यवतमाळच्या एमआयडीसीत भूखंड खरेदी केलेल्या २५० उद्योजकांची नोंद आहे. त्यापैकी १३० भूखंडावर प्रत्यक्ष उद्योग उभारले गेले. लॉकडाऊनपूर्वी यातील ६० ते ७० उद्योग सुरू होते. लॉकडाऊनच्या काळात फुड, बेकरी, कृषीवर आधारित, दालमिल, जिनिंग-प्रेसिंग या सारखे अत्यावश्यक सेवेतील उद्योग तेवढे सुरू होते. परंतु आता प्रशासनाने इतरही उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे.
ठळक मुद्दे‘एमआयडीसी’त सव्वाशे उद्योग : केवळ फूड, जिनिंग सुरू