यवतमाळ : शहरात काेण कुठे काय करेल, याचा नेम राहिलेला नाही. रस्त्यावर प्रत्येक माणूस आता स्वत:ला असुरक्षित समजत आहे. कायद्याचा धाक नसल्याने सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. साेमवारी रात्री तलाव फैल परिसरात कुख्यात आराेपींच्या टाेळक्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांनी वाहनाची ताेडफाेड करून काहींना जातीवाचक शिवीगाळ करत धमकावले. शहर पाेलिसांचे पथक घटनास्थळी पाेहाेचताच आराेपींनी तेथून पळ काढला.
सलमान शेख, सलीम शेख, कलीम शेख, हमरान शेख शरीफ ऊर्फ कांगारू, इक्रारखान युसूफ खान ऊर्फ हुक्का, ऋषिकेष गाेरख हरिहर यांच्यासह १३ जणांनी तलवारी व काठ्या हातात घेऊन रस्त्यावर गाेंधळ घातला. इतकेच नव्हे, त्यांनी एका ऑटाेरिक्षाची व दुचाकीची ताेडफाेड केली. परिसरातील नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे तलाव फैल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. घटनेची माहिती मिळताच शहर ठाणेदार नंदकुमार पंत घटनास्थळी पाेहाेचले. पाेलीस आल्याचे पाहून गाेंधळ घालणाऱ्या आराेपींनी पळ काढला. पाेलिसांनी पाठलाग केला; मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
याप्रकरणी पाेलिसांनी कलम १४३, १४७, ४/२५ नुसार गुन्हा दखल केला. अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. गाेंधळ घालणाऱ्या कुख्यात आराेपींचा पाेलीस शाेध घेत आहेत.