लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : एका नवजात शिशूचा येथील ग्रामीण रुग्णालयातील जनरल वाॅर्डमध्ये मृत्यू झाला. वारंवार विनंती करूनही डाॅक्टर उपचारासाठी आले नाहीत, शिवाय प्रसूतीगृहातही वेळेत न हलविल्याने मृत्यू झाल्याचे सांगत या हलगर्जीपणाबद्दल डाॅक्टरांसह दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. अंकिता शिवाजी बेदरकर (२६, रा. तळवेल, ता. चांदुर बाजार) ही महिला बाळंतपणासाठी माहेरी कळंब येथे आली होती. मागील एक महिन्यापासून ती कळंब व यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत होती. दरम्यान, बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अंकिताला कळा यायला लागल्या, त्यामुळे तिला कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तिथे तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंकिताला प्रसवकळा येत असल्याची माहिती नर्सला देवून उपचारासाठी डॉक्टरला बोलावण्याची विनंती केली. परंतु कोणीही उपचार केला नाही. अंकिताला प्रसूतीगृहात हलविण्याची सुध्दा तसदी काेणी घेतली नाही. प्रसूतीला वेळ आहे, असे सांगून दुर्लक्ष केले. शेवटपर्यंत जनरल वॉर्डमध्येच ठेवण्यात आले. शेवटी जनरल वॉर्डमध्येच सकाळी ६ वाजता प्रसूती झाली. अंकिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचे वजनही सव्वातीन किलोच्या आसपास होते. परंतु सुरुवातीपासूनच्या उपचाराअभावी तिचे बाळ २० मिनिटांनी मरण पावले. नवजात बाळाचा हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे म्हणणे असल्याचेही संगीता मोहोळे यांनी कळंब पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. दुपारी ४ च्या दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. दोषींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
प्रथमदर्शनी हलगर्जीपणा कारणीभूत - वैद्यकीय अधीक्षक - प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याप्रकरणी डॉ. प्रशांत कनाके व परिचारिका कृतिका गाडगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पाठविला जाईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.