घाटंजी : तालुक्यातील १०५ गावांपैकी तब्बल १०० गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात कोरोनाने शिरकाव केला. मात्र, ५ गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच थांबविले. तालुक्यातील २,३९० जणांनी कोरोनावर मात केली. तथापि, आत्तापर्यंत ३६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण भांबोरा येथे १५ जुलै २०२० रोजी आढळून आला होता. तेव्हापासून कोरोनाने पाहता पाहता १०० गावात शिरकाव केला. यात ग्रामीण मधील १ हजार ६२०, तर शहरातील ८८९ अशा एकूण २ हजार ५०९ जणांना कोरोनाची लागण झाली. याही परिस्थितीत रुग्णांनी आपले मनोबल खचून न देता आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमाने कोरोनावर मात केली. यात ग्रामीण मधील १ हजार ५३४, तर शहरातील ८५६ अशा एकूण २ हजार ३९० रुग्णांचा समावेश आहे. मात्र, ३६ रुग्णांची कोरोनाशी झुंज निष्फळ ठरली. यात ग्रामीणमधील २३, तर शहरातील १३ रुग्णांचा समावेश आहे. सध्या तालुक्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह ८३ रुग्ण उपचार घेत आहे. यामध्ये ग्रामीण मधील ६३, तर शहरातील २० रुग्णांचा समावेश आहे. येथील कोविड सेंटरला चार ऑक्सिजनसह १०० बेडची सुविधा आहे. रुग्णांच्या सेवेसाठी तीन डॉक्टर, दोन जीएनएम, तीन एएनएम, एक लॅब टेक्निशीयन, एक फार्मासिस्ट, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर असे मनुष्यबळ कार्यरत आहे.
तालुक्यात ७० टक्के चाचण्या पूर्ण
शहरातील नगरपरिषद उर्दू शाळा व खापरी नाका येथे कोविड चाचणी केली जात आहे. पारवा, रामपूर, शिवणी व भांबोरा येथे कोरोना तपासणी नियोजनानुसार वेळोवेळी शिबिर घेण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक गावात आरोग्य चमू जाऊन नागरिकांची कोरोना चाचणी करीत आहे. जवळपास ७० टक्के चाचणी पूर्ण झाली आहे.
बॉक्स
कोराेनामुक्त पाच गावे , ६,३०० जणांनी घेतली लस
तालुक्यातील १०५ गावांपैकी पाच गावांनी कोरोनाला नो एन्ट्री देत गावाच्या वेशीबाहेरच थांबविले. त्यामध्ये मजरा, लव्हाना, दडपापूर, गवरथडा व राजेगाव या गावांचा समावेश आहे. घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात ९ फेब्रुवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आजपर्यंत ६ हजार ३०० नागरिकांनी लस घेतली. मात्र, सध्या कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नसल्याने ७५० नागरिक प्रतीक्षेत आहे. लवकरच त्यांनाही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक निरज कुंभारे यांनी दिली.
कोट
तालुक्यात कोरोना आटोक्यात येत आहे. आणखी दोन कोविड सेंटर देण्यात येत आहे. एक जांब येथे तर दुसरे इंझाळा, झटाळा किंवा बेलोरा यापैकी एका ठिकाणी होणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे.
डॉ. धर्मेश चव्हाण,
तालुका आरोग्य अधिकारी, घाटंजी