उत्पादन घटले : लग्नसराईमुळे मागणीत वाढ, दीड महिना दर कमी होण्याची शक्यता नाही पुसद : वाढत्या तापमानामुळे जीवाची लाहीलाही होत असतानाच आता या तापमानाचा परिणाम भाजी बाजारातही दिसून येत आहे. उत्पादन घटल्यामुळे भाव वाढले आहे. तसेच सध्या लग्नसराईमुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. या सर्व बाबींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर झाला आहे. पंधरवड्यापासून पुसद तालुक्यात उन्हाचा पारा ४० ते ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. १५ एप्रिलपर्यंत भाज्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे होते. परंतु उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसेही यातून उरले नाही. गेल्या अनेक वर्षाच्या उन्हाळ्यातील भाज्यांच्या दरावर नजर टाकली असता तुलनेने यावर्षी उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात स्वस्त भाजीपाला होता. परंतु मागील दोन आठवड्यांपासून तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले. याचा परिणाम दरवाढीवर झाला. वांगी, गवार, हिरवी मिरची, फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, मेथी, पालक, कारले, दोडकी, भेंडे या सर्व भाज्या किमान ५० टक्के महागल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हतबल झाला आहे. सध्या बाजारात भेंडी ४० रुपये किलो, तसेच फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, वांगी, दोडके या भाज्या ४० रुपये किलो, मेथी, पालक, गवार ६० ते ७० रुपये किलो, कोशिंबीर ९० ते १०० रुपये, शिमला मिरची ६० ते ८० रुपये किलोने उपलब्ध आहे. घाऊक बाजाराच्या तुलनेत जवळपास ४० ते ५० टक्के जादा दराने किरकोळ व्यापारी भाजी विक्री करतात. या किरकोळ व्यापाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने सामान्य ग्राहकाला आणखीच भाजी अधिक दराने विकत घ्यावे लागते. गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आता उन्हाच्या काहिलीने घटलेली आवकही निम्यावर आली आहे. त्यामुळे आधीच पाणीटंचाईने त्रस्त सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने भाजीपाला ट्रान्सपोर्टींगचा खर्चही वाढला आहे. याचाही परिणाम बाजारावर दिसून येत आहे. यासंदर्भात काही तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता कृषीभूषण दत्ता जाधव म्हणाले, सध्या पुसद तालुक्यातील तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने लागवड केलेल्या भाज्या जास्त तग धरू शकत नाही. पुरेसे पाणी न मिळाल्याने त्या वाळून जातात व उन्मळून पडतात. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे तर वीज नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बाजारात माल येणार कुठून. सध्या वाढलेले तापमान व पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांमुळे पुढील दीड ते दोन महिने भाज्यांच्या दरात तेजी राहील, असेही जाधव म्हणाले. तर तालुक्यातील वनवार्ला येथील शेतकरी वैभव फुके यांच्या मते आतापर्यंत पाण्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन बऱ्यापैकी होते. परंतु बाजारात शेती खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळाला नाही. आता पाणी संपत आले. अनेकांच्या शेतात पाणीच नाही. तापमान वाढत असल्याने फुले लागत नाही. भाजीपाला टिकत नाही. त्यामुळे भाजी शेती सध्या बिकट झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
उन्हामुळे भाज्यांना महागाईचा तडका
By admin | Published: May 03, 2017 12:19 AM