यवतमाळ - स्वातंत्र्य संग्राम सेनानी, उत्तम राजकारणी तसेच सजग, व्यासंगी पत्रकार राहिलेल्या जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे कार्य २६ वर्षांनंतरही दीपस्तंभासारखे उभे आहे. त्यांनी या तीनही भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समाज जीवनावर वेगळा ठसा उमटविल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. राष्ट्रनिर्मितीसाठी बाबूजींनी दिलेले योगदान अभूतपूर्व तसेच प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २६व्या स्मृतिसमारोहानिमित्ताने प्रेरणास्थळ येथे आयोजित प्रार्थना सभेत ते शनिवारी बोलत होते. वाराणसी येथील धर्म सम्राट स्वामी करपात्रीजी केदार घाटचे स्वामी अभिषेक ब्रह्मचारीजी, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, माजी शालेय शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, बिहारमधील युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांची मंचावर उपस्थिती होती.
विखे-पाटील पुढे म्हणाले, काही व्यक्तिमत्त्वे ही अलौकिक कार्याद्वारे जनमानसावर आपली छाप निरंतर निर्माण करतात. बाबूजी त्यापैकी होते. त्यांचे जीवनकार्य महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे. सोशल मीडियाच्या आजच्या काळात समाज उभारणीत योगदान देणाऱ्यांना नवी पिढी विसरत आहे. मात्र, महाराष्ट्राला अध्यात्माचा वारसा असून, वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. ज्ञानेश्वर, तुकोबांच्या अभंगांचा परिणाम इथल्या प्रत्येकाच्या जीवनावर जाणवतो. संप्रदायाने जे दिले, त्याच्याशी नाळ कायम राहिल्याचे महाराष्ट्रात पाहायला मिळते. त्यामुळेच २५ लाखांवर भाविक पंढरपूरला पायी जातात. ही संप्रदायाची ताकद आहे. भारत तरुणांचा देश आहे. इथल्या या परंपरा, गौरवशाली वारशाचा उपयोग राष्ट्रनिर्माणाकरिता झाला पाहिजे, त्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. जुन्या लोकांनी खस्ता खाल्ल्या, पायाचे दगड झाले, म्हणून हे मंदिर उभे राहिले. स्वातंत्र्य चळवळीसह राष्ट्रनिर्मितीमध्ये ज्यांनी योगदान दिले, जी भूमिका मांडली, त्याचे पावित्र्य राखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. जगाच्या पाठीवर देशाची ओळख निर्माण होत असतानाच ज्ञानाने ही पिढी समृद्ध व्हावी, नवा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागृत व्हावा, यासाठी काम करण्याची आवश्यकता असून, अशा वेळी बाबूजींचे कार्य आपल्याला दिशा दाखविते, असे ते म्हणाले. बाबूजींचा हा समृद्ध वारसा व परंपरा ‘लोकमत’च्या माध्यमातून विजय व राजेंद्र दर्डा यांनी जपला, जोपासला. तिसरी पिढीही तो सक्षमपणे पुढे घेऊन जात असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी स्वामी अभिषेक ब्रह्मचारीजी यांनी मार्गदर्शन केले. यवतमाळमधील प्रेरणास्थळी आल्यावर राजघाटाची आठवण येते. येथे वडिलांचे व्यक्तित्त्व आणि कर्तृत्वाची मनोभावे जपणूक होत असल्याचे दिसले. वडिलांप्रति मुलांचे काय कर्तव्य असते, ते इथे पाहायला मिळाले. बाबूजींचे कार्य व्यापक होते. शेवटच्या घटकाच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वाहिले. यवतमाळातील हे प्रेरणास्थळ नव्या पिढीला कायम ऊर्जा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजेंद्र दर्डा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वैचारिक वारशामुळेच महाराष्ट्राबाहेरही ‘लोकमत’ची पताका- लोकसेवेचा वसा घेऊन बाबूजी आयुष्यभर झटले, त्यात सर्वांत महत्त्वाची व्यक्ती हा येथील कष्टकरी, शोषित, वंचित, उपेक्षित घटक होता. त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनाची पहाट उजाडावी यासाठी त्यांनी कार्य केले. ‘लोकमत’ही आज त्याच वाटेने पुढे जात आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा आणि दिल्लीमध्येही मोठ्या अभिमानाने ‘लोकमत’ मराठी पताका फडकवीत असल्याचे डॉ. विजय दर्डा म्हणाले. - बाबूजींनी वीज, पाणी, सिंचन, उद्योगासह गृहनिर्मिती आदी क्षेत्रांतील प्रश्नांची तळमळीने सोडवणूक केली. दूरदृष्टीने त्यात बदल घडविण्याचा प्रयत्न केला. मागील २६ वर्षांपासून प्रेरणास्थळाने केवळ परिवारालाच नाही तर संपूर्ण राज्याला शोषित, वंचितांच्या उत्थानासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली. प्रेरणास्थळी आज हा त्याचाच समारोह असल्याच्या भावनाही डॉ. दर्डा यांनी व्यक्त केल्या.