घाटंजी : तालुक्यातील शिरोली येथील नवचैतन्य बहुउद्देशीय विकास युवा मंडळ संस्थेने आपल्या कार्य क्षेत्रात जल, जमीन, जंगल या विषयावर वेगवेगळे उपक्रम राबविले आहे. आता वृक्षांच्या मुळाचे बुरशीपासून संरक्षण करण्याचा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे.
नवचैतन्य संस्था वृक्ष लागवड, संवर्धन आदी उपक्रम राबविते. यात गुरांपासून झाडांचे रक्षण करण्याकरिता कुंपण, पाणी देणे आदी कामे केली जातात. आता संस्थेने या कार्यासोबत झाडांच्या खोडाला लागणाऱ्या किडीचे नियंत्रण व मुळांना लागणाऱ्या बुरशीपासून रक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता संस्थेने कृषी सहायक पी.के. कुंचटवार यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्डो मिश्रण तयार करून घेतले. ते झाडाच्या खोडाला जमिनीपासून वर तीन फूट लावण्यात आले.
परिसरात तूर्तास ३१५ झाडांना हे बुरशीनाशक मिश्रण लावण्यात आले आहे. बोर्डो मिश्रण झाडांच्या खोडाचे किडी व बुरशीसून रक्षण करते. तसेच झाडाच्या आयु मर्यादेत वाढ होते. रस्त्याच्या सुंदरतेत भर पडते. या उपक्रमाकरिता कपिल कानिंदे यांनी आर्थिक मदत केली. श्रमदानासाठी राजेंद्र घोरपडे, अमोल पाटील, अनिल घोरपडे, अमोल गायकवाड आदींनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव राहूल जीवने यांनी प्रयत्न केले.