यवतमाळ : राम मंदिर आंदोलनादरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. या काळात भाजप मर्यादित पक्ष होता. त्यावेळी ओबीसी व बहुजन समाजाच्या नेत्यांनी पक्षवाढीसाठी कष्ट उपसले. आज सत्ता मिळाली आहे. या सत्तेच्या काळात ओबीसी नेते दुर्लक्षित केले आहे. इतर पक्षातून येणाऱ्यांसाठी पायघड्या टाकल्या जात आहे. सामान्य ओबीसी कार्यकर्ता पक्षाच्या या धोरणामुळे दुखावला आहे. ज्यांनी आजतागायत निष्ठा राखून हालअपेष्टा सहन करीत पक्षाला मोठे केले, त्यांचा कुठेही विचार होत नसल्याची खंत भाजपचे माजी खासदार राजाभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केली.
विदर्भ, खान्देश, मराठवाड्यात पक्षाला बळकट करण्यासाठी गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, अरुण अडसड, महादेवराव शिवणकर, एकनाथ खडसे, माजी खासदार विजयराव मुडे यासह अनेक ओबीसी नेत्यांनी खस्ता खालल्या. यातील थोडे बहुत नेते आज आहेत.
मात्र त्यांचीही दखल पक्षाने कधीच घेतली नाही. सत्ताजवळ येताच इतर पक्षातील संधी साधूंनी भाजपमध्ये एन्ट्री केली. आता तेच पक्षाच्या ध्येय धोरणात पुढे-पुढे करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही स्थानिक आमदार मदन येरावार यांनी भाजपला अल्पसंख्याकांच्या हातात दिले आहे. येथील ओबीसी जिल्हाध्यक्षाला पदावरून काढत नितीन भुतडा यांची वर्णी लावली. या भुतडाचे पक्षातील योगदान काय, त्यांना आपण अजूनही पाहिले नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच जिल्हा दौऱ्यावर होते. विविध कार्यक्रमही झाले. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण जाणीवपूर्वक देण्यात आले नाही, असा आरोप राजाभाऊ ठाकरे यांनी केला. हा प्रकार संतापजनक आहे. ओबीसींचा भाजप नेत्यांकडून केवळ सत्तेसाठी वापर होत असल्याने कार्यकर्त्यांत निराशा असल्याची खदखद त्यांनी बोलून दाखविली.
राजाभाऊंनी स्वत:हूनच यायला हवे
राजाभाऊ ठाकरे हे भाजप प्रदेश कार्यकारिणीत सदस्य आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर बोलावण्याची गरज नाही. त्यांनी स्वत:हून यायला हवे. यावेळी अण्णासाहेब पारवेकर प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठी स्वत:हून आल्याचे भाजप नेते आमदार मदन येरावार यांनी 'लोकमत'ला सांगितले.