यवतमाळ : १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार करणा-या टी-१ वाघिण अवनीची शिकार केल्या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी उच्च पदस्थ अधिका-यांची एक समिती मंगळवारी पांढरकवडा तालुक्यात दाखल झाली. अवनी या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याऐवजी तिला गोळी घालून ठार केल्याने देशभर वादळ उठले आहे. वन्यजीवप्रेमी तिच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासनाने चौकशीची तयारी दर्शविली. त्या अनुषंगाने एक उच्चपदस्थ सदस्यांची समिती मंगळवारी पांढरकवडा वनविभागात पोहोचली. या समितीने वाघिणीला पकडण्यासाठी निर्माण केलेल्या कक्ष क्र.१४९ या बेस कॅम्पला भेट दिली. तेथेच त्यांची बैठकही झाली. या समितीमध्ये वन्यजीवप्रेमी, उच्च पदस्थ वनअधिकारी, दिल्लीतील व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे अधिकारी आदींचा समावेश असल्याचे सांगितले जाते. वाघिणीची शिकार करणाºया हैदराबाद येथील नवाब व त्याच्या मुलालाही या समितीपुढे पाचारण करण्यात आले आहे. मात्र या समितीपासून नागरिक व प्रसार माध्यमांना दूर ठेवले गेले आहे.पांढरकवडा वनविभागांतर्गत वनपथकाने गोळी घालून ठार केलेल्या नरभक्षक वाघीण अवनीच्या मृत्युची चौकशी कक्ष क्र १५० लोणी येथे सुरू आहे. त्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. डॉ. एस.एच. पाटील (पीसीसीएफ, उत्पादन व व्यवस्थापन) हे या समितीचे अध्यक्ष आहेत. वन्यजीव संरक्षण ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया हे सदस्य, तर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोळकर (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. चार मुद्यांवर या समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरपूर्वी या समितीला आपला स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर करायचा आहे. समितीकडे चौकशीसाठी केवळ ०९ दिवस आहेत.
वाघिणीची शिकार : पांढरकवडा येथे चौकशी समिती दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 4:17 PM