यावर्षी रोहिणी नक्षत्रात मान्सूनपूर्व पाऊस आला. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे मृग नक्षत्रापूर्वीच झाली. मृग नक्षत्राच्या प्रारंभीच चांगला पाऊस आला. त्यामुळे या नक्षत्रातच जवळपास ७० ते ७५ टक्के पेरणी पूर्ण झाली; परंतु पेरणीनंतर मात्र पावसाने डोळे वटारले. १०-१५ दिवस पावसाचा पत्ताच नव्हता. त्यामुळे सोयाबीनसह अन्य पिकांवर पावसाच्या उघाडीचा मोठा परिणाम झाला. त्यानंतर गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात विविध भागांत पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरिपाच्या पिकाला जीवनदान मिळाले आहे. पिकाची वाढ जोमाने होत आहे. मात्र, पिकाच्या वाढीसोबतच सोयाबीन पिकामध्ये खोड पोखरणाऱ्या किडी व चक्रभुंग्यांचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या किडीचे वेळीच योग्य नियोजन करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत. सोयाबीनशिवाय मूग, उडीद, तूर, कपाशी या पिकांवरही विविध किडींचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे कृषी विभागाने तालुक्यातील शेतकऱ्यांना या रोगाविषयी मार्गदर्शन करण्याची मागणी केली जात आहे.
पांढरकवडा तालुक्यात सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:31 AM