अस्वस्थतेकडून समाजसेवेकडे : ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’चा ३५ वा कार्यक्रमकाशीनाथ लाहोरे यवतमाळआपले मन संवेदनक्षम असेल तर साध्या-साध्या प्रश्नांनी ते अस्वस्थ होते. ही अस्वस्थता आपणास चैन पडू देत नाही. कुठे तरी काही तरी सृजनात्मक केले पाहिजे, या विचाराने झोप उडते. कशातच लक्ष लागत नाही. मानवी जीवनाचे क्षणभंगुरत्व हादरवून सोडते आणि मग सुरू होतो एक परमकारूणिक समाजसेवेचा प्रवास. अर्थात या मार्गात अडचणी येत नाहीत असे नाही. परंतु झपाटलेपणाची उर्मी एवढी असते की, अडचणी याच संधीच्या रूपात परिवर्तीत होतात. जगाच्या इतिहासात महान कार्य करणाऱ्यांचा इतिहास हा जवळपास असाच सुरू झाला आहे. आजची तरुणाईसुद्धा याला अपवाद नाही. ज्या वयात गुलाबी स्वप्ने पडतात. त्याच वयात किंबहुना त्यापूर्वीही इतरांच्या दु:खाने अंतर्बाह्य ढवळून निघणारे युवक आजही आहेत. ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ या प्रयास-सेवांकुरच्या ३५ व्या कार्यक्रमात येथील नंदुरकर विद्यालयात हाच प्रत्यय उपस्थितांना आला. जेमतेम २५-३० वर्षांच्या युवकांना आलेले समाजभान इतरांना प्रेरणा देणारे आहे, हे निश्चित. अमरावतीचे स्वप्नील गावंडे हे अभियांत्रिकीची पदवी घेऊन नोकरीसाठी कंपन्यांचे उंबरठे झिजवित नाहीत. शालेय जीवनात संगीताची आवड, त्यामुळे अनेक अंधांशी संबंध. सहाव्या वर्गात जवळचा अंध मित्र अब्दुलचे निधन. जगातील सौंदर्य पाहता न आलेला अभागी मित्र कुठेतरी मनाला चटका लागला आणि नेत्रदानासाठी काहीतरी केलेच पाहिजे हा संदेश हृदयात कोरला गेला. पुढे दिशा ग्रुपची स्थापना झाली अन् ७०० महाविद्यालयात भाषणे, दहा लाख लोकांशी नेत्रदानासाठी संपर्क, चार लाख देणगी फॉर्म भरून घेणे, १८०० युवकांना या चळवळीत आणणे, २१०० लोकांचे प्रत्यक्ष नेत्रदान करून घेणे, यवतमाळ व अमरावती येथे आय बँक स्थापन करणे आणि हे सगळे वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत झपाटलेपण कसे असते याचे हे मूर्तीमंत उदाहरण.देवेंद्र गणवीर हा युवक गोंदियाचा. शिक्षण केवळ बी.ए. मराठी. भाषा धड बोलता येत नाही. आपल्यातील कमीपणा दूर करण्याचा प्रयत्न हळूहळू केला आणि आज अनेकांना रोजगार मिळवून देणारा आयकॉन बनला. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात अनेक नामांकित कंपन्यांना बोलावून युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देणाऱ्या या युवकाने ४५० युवकांना रोजीरोटीला लावले. डॉ. प्रशांत कुचनकर हा बीएएमएस झालेला तरुण. ग्रामीण भागातून आलेला. शहरी संस्कृतीला घाबरणारा. सर्वप्रथम रॅगिंगला विरोध केला. हळूहळू लिडरशीप वाढली. स्वत:ला विकसित करण्यासाठी विविध कलागुण आत्मसात केले. आज नागपूरला क्लिनिक असून समविचारी दहा डॉक्टरांचा समूह तयार केला आहे. वेगवेगळ्या पॅथीचा अभ्यास करून रुग्णांना अतिशय प्रेमाने, कमीत कमी खर्चात व कमीत कमी औषधीत दुरुस्त करणे हे त्यांचे ध्येय आहे. स्वत:ला विकसित करण्यासाठी जे प्रयोग केले तेच आज ते रुग्णांवर करीत आहेत. डॉ. प्रशांत कुचनकर यांनी जोडलेल्या दहा तरुण डॉक्टरांपैकी एक म्हणजे डॉ. विराज गिते. अत्यंत हळवे व्यक्तिमत्व. नैराश्य ठासून भरलेले. समाजसेवेचे आणि ‘स्व’चे भान आलेला हा तरुण डॉक्टर आपल्यापरीने रुग्णसेवेस समर्पित जीवन जगतो आहे.डॉ. नम्रता कपुरे यासुद्धा डॉ. प्रशांत कुचनकर यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या तरुण डॉक्टर. नैराश्य, आत्मविश्वासाची उणीव, संभाषण कौशल्य नाही अशी एकेकाळची प्रतिमा. त्यांच्यात हळूहळू आत्मविश्वास वाढला. आज अनेकांना अनेक विषयांवर समूपदेशन करणारी ही युवती समूपदेशनासाठी परदेशी जाण्यास तयार झाली आहे. डॉ. अविनाश सावजी यांनी या पाचही युवकांना बोलते आणि यवतमाळकरांना प्रेरित केले आहे.
जीवनात आलेल्या अनुभवातून घडलेल्या युवकांनी जागविल्या प्रेरणा
By admin | Published: February 21, 2017 1:27 AM