यवतमाळ : वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे १३५ फूट उंच सेवाध्वज स्थापना, संत श्री सेवालाल महाराज यांचा भारतातील एकमेव पंचधातूचा अश्वारूढ पुतळा अनावरण व ५९३ कोटींच्या विकासकामांची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी येथे दि. १२ फेब्रुवारीला होणार आहे. कार्यक्रमाला देशभरातून जवळपास लक्षावधी बंजारा बांधव येणार आहेत.
हा कार्यक्रम बंजारा समाजातील हजारो पदाधिकारी, बंजारा समाजाचे नेते तथा अन्न व औषधी प्रशासनमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारात होत आहे. पोहरागड येथील स्थानिक पायाभूत सुविधा व मंदिर सुशोभीकरण, नंगारा भवन वाढीव बांधकाम व अंतर्गत व्यवस्था, बायोलाॅजीकल पार्क तसेच इतर विविध विकासकामे प्रस्तावित आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मनोहर नाईक तसेच प्रमुख पाहुणे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री डॉ. सुरेश खाडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादाजी भुसे, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दीपक केसरकर, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, चंद्रकांत ठाकरे, अनंतकुमार पाटील, विनोद राठोड, सरपंच पोहरादेवी, कपिल पवार सरपंच उमरी, अविनाश नाईक, आमदार निलय नाईक, उमेश जाधव, प्रभू चव्हाण, सत्यवती राठोड, कविता मालोध, आमदार तुषार राठोड, आमदार इंद्रनील नाईक, हरिभाऊ राठोड, धोंडीराम राठोड, राजेश राठोड, प्रदीप नाईक, किसनराव राठोड, शंकर पवार तसेच महंत बाबूसिंग महाराज, जितेंद्र महाराज, कबीरदास महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज, रायसिंग महाराज, सुनील महाराज उपस्थित राहणार आहेत.
देशातील चार मार्गाने येणार रथयात्रा
आधी देशातील चार मार्गाने सेवादास महाराजांची रथयात्रा सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमधील भायागड, तेलंगणामधील सेवागड, मुंबई येथील सांताक्रुज व मध्य प्रदेशातील शिवाबाबा गड अशा चार राज्यांतून ही रथयात्रा सुरू आहे. रथयात्रेच्या मार्गावर समाजबांधवांकडून रथयात्रेचे प्रचंड स्वागत करण्यात येत असून, ही रथयात्रा ११ फेब्रुवारीला वेगवेगळ्या चार मार्गाने पोहरादेवी येथे पोहाेचणार आहे.