लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने जास्तीत जास्त सुविधा देण्याकडे शासनाचा कल आहे. आता ग्रामपंचायतमधील सर्व दाखले घरबसल्या मिळणार आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभागाने महा ई ग्राम उपक्रम हाती घेतला आहे. यात सर्व दाखले, प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांना महा ई ग्राम अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.
पूर्वी केवळ जमिनीचा सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने काढला जात होता. मात्र, मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जागेचा उतारा, ग्रामपंचायतीत मिळणारे जन्म, मृत्यू प्रमाणपत्र यांसारखे अनेक दाखले मिळणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, आपण यापूर्वी केलेल्या कराचा भरणा, ही माहिती अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाने महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचा अॅप लॉन्च केला आहे. हा अॅप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून नागरिक घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले काढू शकतात.
यामुळे त्यांच्या वेळेत बचत होणार असून, कुणा मागे फिरावे लागणार नाही. मात्र, महा ई ग्रामची अजूनही म्हणावी तशी जनजागृती करण्यात आली नाही. नागरिकांनाही महा ई ग्रामबाबत फार काही माहीत नाही. ज्यांना माहीत आहे त्यांनी अॅप इन्टॉल केले आहे.
वेळेची होणार बचत महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट अॅप्लिकेशन अॅप मोबाइलमध्ये इन्स्टॉल केल्यास घरबसल्या ग्रामपंचायतमधून मिळणारे दाखले काढता येणार आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेत बचत होणार असून, दाखल्यासाठी ग्रामपंचायतीत चकरा माराव्या लागणार नाहीत. मात्र यासंदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांत म्हणावी तितकी जनजागृती नाही.
मालमत्ता कर भरा अॅपवर मालमत्ता कराचा भरणा करावयाचा असल्यास नागरिक थेट ग्रामपंचायतीत जातात. आपण जातो नेमके त्याच वेळी कर्मचारी राहत नाही. यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागतो. मालमत्ता कर अॅपवर भरता येणार असल्याने मोठी सुविधा निर्माण झाली आहे.
कोणते दाखले मिळतात?महा ई ग्रामच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, नमुना आठ, विवाह नोंदणी दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी कर आदी दाखले मिळण्याची सुविधा आहे.
महा ई ग्राम अॅप डाऊनलोड कसे कराल?आपल्या मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट अॅप हे इन्स्टॉल करा. अॅप ओपन करून रजिस्टर करा. त्यामध्ये आपले नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ई मेल आयडीसह सर्व माहिती जतन करा. प्रमाणपत्र, दाखले मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून प्रमाणपत्र मिळवता येईल.