यवतमाळ : शेतकरी कुटुंबाला अपघात विम्याचा लाभ देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल दि ओरिएन्टल इंशुरन्स कंपनीला, तर प्रकरण सादर करण्यास दिरंगाईचा आरोप सिद्ध झाल्याबद्दल पांढरकवडा तहसीलदारांना जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. झुली (ता. पांढरकवडा) येथील ठाकरे या शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर हा आदेश देण्यात आला आहे. गजानन बापूराव ठाकरे यांचा ९ फेब्रुवारी २००८ रोजी अपघाती मृत्यू झाला. शासनाने काढलेल्या शेतकरी व्यक्तिगत विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी संबंधितांकडे पाठपुरावा केला. यात विमा कंपनीसह कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाचा समावेश होता. मात्र त्यांच्या अर्जाची कुठेही दखल घेण्यात आली नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना टोलविले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही समाधानकारक सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे हक्काच्या रकमेपासून सदर कुटुंब वंचित राहिले. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार नोंदविली. शारदाबाई गजाननराव ठाकरे, प्रज्वल गजाननराव ठाकरे, वैभव गजाननराव ठाकरे, रोशन गजाननराव ठाकरे यांची संयुक्त तक्रार न्यायमंचने दाखल करून घेतली. याप्रकरणात दोन्ही बाजुकडून युक्तिवाद करण्यात आला. यात न्यायमंचने ठाकरे यांची तक्रार अंशत: मंजूर केली. गजानराव ठाकरे यांचा मृत्यू विमा कालावधीत झाला मात्र पांढरकवडा तहसीलदारांनी आवश्यक ती कारवाई केली नाही. या प्रकरणात पांढरकवडा तहसील कार्यालयाकडून दिरंगाई करण्यात आली. याप्रकरणात दि ओरिएंटल इंशुरन्स कंपनी आणि पांढरकवडा तहसील कार्यालय ठाकरे कुटुंबीयांना विमा लाभापासून वंचित राहण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. विमा कंपनीने ठाकरे यांना योजनेची रक्कम रुपये एक लाख आणि मानसीक व शारीरिक त्रासापोटी पांढरकवडा तहसील कार्यालयाने दोन हजार रुपये व तक्रार खर्चापोटी एक हजार रुपये द्यावे असा आदेश दिला आहे. मंचचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सदस्य अॅड. आश्लेषा दिघाडे, डॉ. अशोक सोमवंशी यांनी हा आदेश दिला. सदर प्रकरणात ठाकरे यांची बाजू अॅड़ हजारे, अॅड़ राठी यांनी मांडली. (वार्ताहर)
पांढरकवडा तहसीलदारासह इन्शुरन्स कंपनीला चपराक
By admin | Published: December 22, 2015 3:55 AM