भूजल दीड मीटरने वाढले : अतिरिक्त उपाययोजना टळल्या यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी पावसाळा लांबला असला तरी, भूजल पातळी मात्र कायम आहे. परिणामी अतिरिक्त उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची गरज प्रशासनाला भासणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी तब्बल दीड मीटरने वाढल्याचे विभागाने सांगितले.गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११० टक्के पाऊस झाला. यावर्षी जून महिना संपाला तरी, जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा स्थितीत भूजल सर्वेक्षण विभागाने सादर केलेला अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या १८१ विहिरींच्या नोंदीवरून हा अहवाल सादर करण्यात आला आहे. यानुसार २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये उपलब्ध पाणीसाठी १.४६ मीटरने वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता राहणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने पाणीटंचाईचा आराखडा अद्याप सादर केला नाही. परिणामी पाणीटंचाईचा सामना करणारी गावे संकटात सापडली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याची भूजल पातळी १.४६ मीटरने अधिक आहे. आर्णी १.४१, बाभूळगाव १.५६, दारव्हा २.२३, दिग्रस १.५४, घाटंजी १.०३, कळंब २.०१, महागाव १.७५, मारेगाव ०.६९, नेर २.५, पांढरकवडा १.७५, पुसद १.७५, राळेगाव १.१२, उमरखेड १.८१, वणी ०.०९, यवतमाळ १.५३ आणि झरी ०.६५ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील भूजल पातळी वाढली असली तरी, काही भागात जमिनीचा पोत पाणी टिकवून ठेवणारा नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक वालदे यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)
वाढत्या पातळीने रोखली तीव्रता
By admin | Published: July 07, 2014 12:07 AM