अविनाश साबापुरे
यवतमाळ : बदलत्या जीवनशैलीत पुरुषांना अनेक आजारांनी पछाडले. त्यातून शारीरिक कुवत घटलेली असतानाही घरात मर्दुमकी गाजविण्याची खुमखुमी काही घटलेली नाही. त्यामुळे उच्च शिक्षित महिलांनाही पुरुषांच्या मारहाणीला आणि लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस’ साजरा केला जात असताना कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाने चव्हाट्यावर आणलेला महाराष्ट्रातील पुरुषी मानसिकतेचा हा विदारक चेहरा...
पुरुषांचे आरोग्य, समाजातील योगदान, स्त्री-पुरुष समानता या गोष्टींवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने १९ नोव्हेंबर ‘पुरुष दिवस’ म्हणून साजरा केला जातो. प्रत्यक्षात या सर्वेक्षणाने पुढे आणलेली माहिती पुरुषांची ‘नको तिथे’ वाढलेली मर्दुमकी स्पष्ट झालेली आहे. महिला आणि पुरुष ही संसाराचीच नव्हे तर समाजाचीही दोन चाके आहेत. पण ‘पुरुष’ नावाचे चाक पंक्चर असूनही मीच मोठा म्हणत स्वत:चाही प्रवास खडतर बनवीत आहे.
२५.२ टक्के महिलांवर त्यांच्या पुरुष जोडीदाराकडून शारीरिक, लैंगिक अत्याचार होत असल्याची आकडेवारी केंद्राच्या आरोग्य विभागाने डिसेंबर २०२० मध्ये केलेल्या या सर्वेक्षणाने पुढे आणली आहे.
कुटुंब नियोजनात अर्धा टक्केच वाटा
जगाची लोकसंख्या ८०० कोटी झाली अन् त्यात भारताने पहिला नंबर पटकावला, तरी लोकसंख्या नियंत्रणासाठी पुरुष मंडळींमध्ये अनुत्साह असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात नसबंदी करून घेणाऱ्या महिलांचे प्रमाण ४९.१ टक्के आहे. तर पुरुषांचे प्रमाण अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी म्हणजे ०.४ टक्केच आहे. तर निरोध वापरणाऱ्या पुरुषांचे प्रमाण केवळ १०.२ टक्के आहे. या उलट महिलांवर काॅपर टी बसविणे, गोळ्या देणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करविणे असे प्रकार अजमावले जात आहेत. कुटुंब नियोजनाची साधने वापरण्याचे महाराष्ट्रातील नागरिकांचे प्रमाण ६३ टक्के आहे. यात पुरुषांचे प्रमाण अर्धाच टक्के असल्याने यातून पुरुषी मानसिकता चव्हाट्यावर आली आहे.
ढेरपोटे पुरुष वाढले
आरोग्याबाबत पुरुष अतिशय बेफिकीर आहेत. तब्बल १६.२ टक्के पुरुषांचा बाॅडी मास इंडेक्स असंतुलित आहे. उंचीच्या तुलनेत वजन अधिक वाढले आहे. २४.७ टक्के पुरुष ‘ओव्हरवेट’ होऊन ढेरपोटे झाले आहेत. तर ४०.७ टक्के पुरुषांची कंबर प्रमाणाबाहेर फुगल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. १३.६ टक्के पुरुष मधुमेहाचे शिकार झाले आहेत. तर २४.४ टक्के पुरुष रक्तदाबामुळे गोळ्या खाऊन जगत आहेत. तरीही ३३.८ टक्के तंबाखूच्या आणि १३.९ टक्के पुरुष दारूच्या आहारी गेलेले आहेत.