यवतमाळ : अट्टल दुचाकी चोरटा पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अलगद अडकला. अटकेदरम्यान त्याने सात दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. सात ते नऊ हजार रुपयात दुचाकीची विक्री केल्याचेही सांगितले. पोलिसांनी या दुचाकी विविध ठिकाणाहून जप्त केल्या. विशेष असे की, चोरीतील दोन दुचाकी या पोलीस कर्मचाऱ्यांच्याच निघाल्या.शेख रिजवान अब्दूल रज्जाक ऊर्फ टोनी (२१) रा. हलबीपुरा कळंब असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. तो कळंब येथून परजिल्ह्यात आणि जिल्ह्यातील काही स्थानांवर जाऊन दुचाकी चोरी करीत असल्याची माहिती विशेष पोलीस पथकाचे फौजदार आर.डी. वाटाणे यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी एका विश्वासातील माणसाला त्याच्याकडे ग्राहक म्हणून पाठविले. वणी येथील बसस्थानक परिसरात त्यांची रविवारी भेट ठरली. यावेळी चोरटा टोनू हा बनावट ग्राहकाला चोरीतील दुचाकी विकणार होता. या वेळी पथकाने तेथे सापळा रचला. बनावट ग्राहकाला टोनू भेटायला येताच पथकाने पकडले. या वेळी त्याने चोरीतील स्वत:जवळ असलेल्या आणि विक्री केलेल्या सात दुचाकींची माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी या सात दुचाकी जप्त केल्या. कारवाईत विशेष पथकातील जमादार ऋषी ठाकूर, गजानन डोंगरे, प्रदीप नाईकवाडे, हरिश राऊत, विशाल भगत, भोजराज करपते, चालक रेवन जागृत आदींनी सहभाग घेतला होता. (स्थानिक प्रतिनिधी)
अट्टल चोरटा पोलिसांच्या सापळ्यात अडकला
By admin | Published: July 21, 2014 12:22 AM