लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेशनचा तांदूळ व गहू याची काळ्या बाजारात विक्री करणारी मोठी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. या टोळीला आजपर्यंत अभय मिळत होते. याचा म्होरक्या कळंब येथील काल्या असून त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्याच्या गोदामातून जवळपास १६ लाखांंचे रेशनचे धान्य जप्त केले. याशिवाय यवतमाळातही दोन धान्य घेवून जाणारे संशयित ट्रक पकडण्यात आले. रेशन माफियाचे नेटवर्क राज्यभर पसरले असून आंतरजिल्हा याची वाहतूक सुरू असते. रेशन धान्यातून उभ्या केलेल्या काल्याच्या नेटवर्कचा तपास करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली. कळंब ठाणेदारांनी या गुन्ह्यात न्यायालयाकडून काल्याची एक दिवसाची पोलीस कोठडी घेतली होती. कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे काळ्याबाजारात विकले जात आहे, याचा पाठपुरावा करीत आहे. याचीच दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. काल्याची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी रेशनच्या काळ्या बाजारावर लक्ष केंद्रित करण्यात आले. जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून, तेलंगणा सीमेवर रेशनचा तांदूळ, गहू साठवून त्याची विक्री केली जाते. या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यामध्ये अनेक बडे मासे आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कळंबच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. रेशनचे धान्य परस्पर विकणाऱ्या या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून पुरेपूर तयारी केली जात आहे. इतकेच नव्हे तर काल्याच्या यवतमाळ जिल्ह्यासह वर्धा, तेलंगाणा येथील नेटवर्कचाही शोध घेतला जात आहे. रेशनचा तांदूळ राईस मिलपर्यंत कसा पोहोचतो, घातक रसायने वापरुन या तांदळावर कशी प्रक्रिया करून त्याला सुगंधित तांदळात मिसळून विक्री केली जाते, याचाही शोध पोलीस घेणार आहे.
पुरवठ्याच्या अहवालाने दोन ट्रक सुटले - जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार रेशनच्या धान्याच्या काळ्या बाजार चालविणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार पोलिसांना नाही, धडधडीत दिसूनही रेशनचे धान्य हे पुरवठा विभागाकडून प्रमाणित करून घ्यावे लागते, बरेचदा पुरवठ्याची यंत्रणा सोईस्कर भूमिका घेवून ते धान्य रेशनिंगचा नसल्याचा अहवाल देतात, त्यामुळेच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी भांबराजा येथे पकडलेला ५०० पोते संशयित तांदुळाचा ट्रक सोडून द्यावा लागला. तर जिल्हा वाहतूक शाखेने आर्णी बायपासवर पकडलेला ट्रकसुद्धा केवळ पुरवठा विभागाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सोडावा लागला. - पोलीस कारवाई करताच पुढे मात्र रेशनचा अहवाल निर्णायक ठरतो. यामुळेच बरेचदा रेशनच्या काळ्या व्यापाराची माहिती असूनही पोलिसांकडून कारवाईसाठी पुढाकार घेतला जात नाही. पुरवठा विभागाचे सहकार्य मिळत नसल्याचेही सांगितले जाते. गरिबाचे धान्य हडपणाऱ्यांविरोधात पोलीस व पुरवठा विभागाला समन्वय ठेवूनच काम करावे लागणार आहे.