यवतमाळ : सतरा वर्षीय मुलगी सात महिन्यांची गर्भवती होती. तिचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान यवतमाळ येथे मृत्यू झाला. रुग्णालयातून या संदर्भात एमएलसी रिपोर्ट पाठविण्यात आला होता. मात्र, याची दखल दिग्रस पोलिसांनी घेतली नाही. ही मुलगी दिग्रस तालुक्यातील रहिवासी असल्याने तेथूनच तपास होणे अपेक्षित होते. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी फटकारल्यानंतर आता वर्षभरानंतर तपासाला सुरुवात झाली आहे.
दिग्रस तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी आजारी असल्याने आई-वडील तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी मुलीला यवतमाळला हलविण्याचा सल्ला दिला. मुलीला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. मुलीने एका बाळाला (पुरुष जातीच्या) जन्म दिला. या बाळाचा प्रसूतीनंतर काही तासांतच मृत्यू झाला. शवविच्छेदन करून हा मृतदेह यवतमाळातील वाघापूर येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आला. रुग्णालयातून एमएलसी रिपोर्ट यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आला. तेथून दिग्रस पोलिसांकडे हा रिपोर्ट गेला. मात्र, त्यावेळी तपास झाला नाही.
महिला व बाल कल्याण विभाग अनभिज्ञ
अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. तिची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली. पहिले बाळ दगावले, नंतर मुलगी दगावली. या गंभीर घटनेची महिला बाल कल्याण विभागाला कुठलीच माहिती नाही. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात महिला अत्याचाराच्या संदर्भाने वन स्टॉप सेंटर चालविले जाते. या सेंटरमधून माहिती जाणे अपेक्षित आहे. मात्र, दिग्रसच्या घटनेत सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
दिग्रस पोलिसांचे पथक यवतमाळात
दिग्रस पोलिसांचे पथक यवतमाळात दाखल झाले. पीडित अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या बाळाचा मृतदेह स्मशानभूमीत शोधला जात आहे. वाघापूर स्मशानभूमीत मृतदेह शोधण्यासाठी सोमवारी खोदकाम करण्यात आले. मुलीवर अत्याचार करणारा कोण याची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणी आवश्यक आहे. या गंभीर प्रकरणात मुलीच्या आई-वडिलांनीही तक्रार दिली नाही. त्यामुळे वेगळाच संशय व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी थंडबस्त्यात टाकलेला गंभीर गुन्हा आता रेकॉर्डवर आला असून, त्याच्या तपासाला गती मिळाली आहे. दिग्रस ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनात तपास केला जात आहे.
२०२१ मधील प्रकरण असून यात अत्याचार व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास केला जात आहे. मृतदेहाच्या नमुन्यावरून डीएनए चाचणी केली जाणारा आहे. त्या आधारे आरोपीचा शोध घेवून कारवाई केली जाईल.
- धर्मा सोनोने, ठाणेदार, दिग्रस