ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : धारमोहा राऊंडमध्ये क्षेत्र सहाय्यक आणि वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत एका अनफिट वनपालाची नुकतीच प्रशासकीय बदली करण्यात आली. क्षेत्र सहाय्यकांची उमरखेड येथे बदली करण्यात आली असून वनपाल धारमोहा बीटमध्ये रुजू झाला आहे. या बदली प्रकरणातील अनियमितता चव्हाट्यावर आली असून आता नागपूर येथील वनसंरक्षकांच्या कारवाईकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
२०१५ मध्ये उमरखेड वनपरिक्षेत्रातील पिरंजी येथील प्रकरणात संबंधित क्षेत्र सहायक निलंबित झाले होते. त्यांचे कॅरेक्टर लपवून पुसद उपवनसंरक्षक कार्यालयाने शिफारस करून परत त्यांना उमरखेडमध्ये बदली दिली. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून बदली प्रक्रियेतील अनियमितता उघड केली. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक साई प्रकाश यांच्याकडे बदली प्रकरणात अनेकांच्या लेखी तक्रारी गेल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रशासकीय बदली प्रकरणाची चौकशी क्रमप्राप्त आहे. बदलीसाठी नेमलेल्या समितीकडे शंकेच्या नजरेने पाहिले जात आहे. पाच सदस्यीय समिती शिफारस आलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे कोणते असे कागदपत्रे तपासतात, त्याचे निकष काय, याची जाण ठेवून बदली प्रकरणे हाताळणे गरजेचे असते. परंतु ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे ही बदली प्रक्रिया उजेडात येत नसल्याने वन विभागात चर्चेला उधाण आले आहे. आता प्रधान मुख्य वनसंरक्षक काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
बॉक्स
नागपूर कार्यालयात धावाधाव सुरू
जिल्ह्यातील नेर येथील एका वनपालाची बदली उमरखेड येथे झाली. त्या ठिकाणावरून त्यांना दिग्रस जायचे आहे. यासाठीसुद्धा व्यवहार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी नागपूर मुख्य कार्यालयात सकाळपासूनच संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रियेबद्दल कान उघाडणी करण्यात आल्याची माहिती आहे. निवड समिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक व पुसद येथील उपवनसंरक्षक यांच्याशी संपर्क केला असता ते नॉट रिचेबल आढळून आले.