यवतमाळ : रविवारी राज्यात प्रौढ निरक्षरांची परीक्षा घेण्यात आली. तर परीक्षा पार पडल्याच्या काही वेळातच केंद्र शासनाकडून या परीक्षेतील उत्तीर्णतेचे निकष शिथिल करण्यात आले. १५० पैकी पूर्वी ५१ गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक होते. परंतु सुधारित निकषानुसार आता ४९.५ गुण मिळाले तरी उत्तीर्ण केले जाणार आहे. तसेच यापेक्षाही कमी गुण असणाऱ्या प्रौढांना अनुत्तीर्ण असा शेरा न देता ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा असलेले गुणपत्रक दिले जाणार आहे.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी १७ मार्च रोजी महाराष्ट्रात ३६ हजार परीक्षा केंद्रावर झाली. या परीक्षेत तब्बल चार लाख ५६ हजार ७४८ प्रौढांनी हजेरी लावली. ही उपस्थिती उल्लास ॲपवरील नोंदणीच्या ७४.०३ टक्के होती. उत्तीर्णतेसाठी पूर्वी वाचन, लेखन व संख्याज्ञान या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५० पैकी १७ गुणांची अट देण्यात आली होती. तर एकूण १५० पैकी ५१ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक होते. आता सुधारित निकषानुसार या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५० पैकी १६.५ गुण तर एकूण ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहे. पेपर तपासणीचे काम सुरू झाले असून सुधारित निकषाबाबत योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी निर्देश जारी केले आहेत. सुधारित निकषानुसारच उत्तरपत्रिका तपासणी व निकाल जाहीर होणार आहे.
या निकषाइतके व त्याहून अधिक गुण प्राप्त झाल्यास उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देण्यात येईल. तर निकषानुसार गुण प्राप्त न झाल्यास अशा परीक्षार्थीस अनुत्तीर्ण ऐवजी ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा गुणपत्रकावर देण्यात येणार आहे. नापास असा नकारार्थी शेरा कोणालाही देण्यात येणार नाही. सुधारणा आवश्यक असलेल्या नवसाक्षरांची उजळणी व सराव सुरू ठेवला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक (योजना) राजेश क्षीरसागर यांनी दिली.
बोलीभाषेतील उत्तरेही ग्राह्य धरणारनव भारत साक्षरतेच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणदानाबाबत केंद्र शासनाने सुधारित निकष दिले. त्यानुसार, प्रौढांनी प्रमाणभाषेऐवजी आपल्या बोलीभाषेत उत्तरे लिहिली असतील, तरी त्यांना गुणदान करण्याच्या सूचना आहेत. तसेच उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्केपेक्षा कमी गुण पडत असल्यास ५ ग्रेस गुण दिले जाणार आहेत. यानंतरही कोणी अनुत्तीर्ण होत असल्यास त्यांना ‘सुधारणा आवश्यक’ असे गुणपत्रक दिले जाणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती प्रौढांनी दिली परीक्षाअमरावती २४६५२, अकोला १८८८१, बुलढाणा ५२३३, यवतमाळ १२९२३, वाशिम १४०२५, वर्धा १३६७, नागपूर ७२००, भंडारा ८२६२, गोंदिया ८५०२, चंद्रपूर २८६७६, गडचिरोली ३३८७६, मुंबई शहर १८०३, मुंबई उपनगर ८६१२, ठाणे १५१५५, पालघर १३२९८, रायगड ७९०२, पुणे ९०४४, अहमदनगर ८३९४, सोलापूर १७५७१, नाशिक २४८३१, धुळे १०२७१, नंदुरबार १६१८३, जळगाव ४१९७५, कोल्हापूर २२५०, सातारा ४२१०, सांगली ७३४३, रत्नागिरी १३३४१, सिंधुदुर्ग २२३, छत्रपती संभाजीनगर १५५९६, परभणी १४२२७, बीड ११९३०, जालना १४२३२, हिंगोली ८७९४, नांदेड १८३९३, धाराशिव ४२२०, लातूर ३५५३, महाराष्ट्र एकूण ४ लाख ५६ हजार ७४८.
हे अभियान सन २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे राज्यातील असाक्षरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. आत्ताच्या परीक्षेत ज्यांना बसता आले नाही त्यांना येणाऱ्या सप्टेंबर किंवा मार्चच्या परीक्षेस बसता येईल.- डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)