लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपसी करारनामा करून म्हाडा वसाहतीमधील दुय्यम गाळेधारकांना हक्क हस्तांतरणाची कार्यवाही नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) केली आहे. मात्र, हीच मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून यवतमाळातील दुय्यम गाळेधारक करीत आहे. नागपूरच्या धर्तीवर अमरावती म्हाडाला अशी कार्यवाही करणे का शक्य नाही, असा सवाल गाळेधारकांनी उपस्थित केला आहे.अमरावती म्हाडा अधिनस्त यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी येथील वसाहतीमधील १३५ मूळ गाळेधारकांनी आपले गाळे आपसी करारनामा करून दुय्यम गाळेधारकांना सुपूर्द केले आहेत. या गाळ्यांमध्ये गेल्या २०-२५ वर्षांपासून हे दुय्यम गाळेधारक राहात आहेत. म्हाडाची देय रक्कम व नगरपरिषदेचा करही ते स्वत:च करीत आहेत.त्यांनी ११ मार्च २०१६ रोजी सदर गाळे आपल्या नावे करण्यासाठी अमरावती मंडळ कार्यालयात अर्ज दिले. परंतु, केवळ वेळकाढूपणा केला जात आहे, असा आरोप विदर्भ गाळेधारक गृहविकास सहकारी संस्थेचे सचिव अॅड. श्याम खंडारे यांनी केला आहे. त्याचवेळी नागपूर म्हाडाने मात्र सकारात्मक पवित्रा घेतला आहे. नागपूर मंडळाच्या अधिनस्त दुय्यम गाळेधारकांकडून अर्ज घेण्यात आले. त्यावर आक्षेप व तक्रारीसाइी जाहीर नोटीस लावण्यात आली. त्यानंतर हक्क हस्तांतरण, नियमितीकरणाची प्रक्रिया राबविणे सुरू केले आहे. असे असताना अमरावती गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यवतमाळच्या दुय्यम गाळेधारकांबाबत दुजाभाव का करीत आहे, असा प्रश्न अॅड. श्याम खंडारे यांनी उपस्थित केला आहे.