९२८ उमेदवार : १३ लाख ७३ हजार मतदार यवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांसाठी बुधवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात ९२८ उमेदवारांचे भवितव्य १३ लाख ७३ हजार मतदार ठरविणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी ३१९, तर पंचायत समितींच्या ११० गणांसाठी ६०९ मतदार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात १३ लाख ७३ हजार १०४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात सात लाख २१ हजार २५४ पुरूष, तर सहा लाख ५१ हजार ८४० महिला मतदार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी एक हजार ७१२ मतदान केंद्र राहतील. गुरूवारी सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरूवात होणार आहे. आता जाहीर प्रचार संपल्याने उमेदवार आणि नेत्यांसाठी बुधवारची रात्र महत्त्वाची ठरणार आहे. मतदानाच्या पूर्वीची रात्र प्रत्येक निवडणुकीत ‘कत्ल की रात’ म्हणून ओळखली जाते. या रात्रीतूनच उमेदवारांचे जय-पराजयाचे आडाखे बांधले जातात. कच्चे दुवे शोधून संबंधित भागात जादा जोर लावला जातो. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद, नितीचा अवलंब केला जातो. यातून विजय सुकर करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळेच ही रात्र महत्त्वाची ठरते. या रात्री उमेदवार, कार्यकर्ते, नेते सर्वच अक्षरश: जागली करतात. रात्रीतून चित्र पालटविण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यामुळे यावेळी बुधवारची ही रात्र सर्व ९२८ उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)
आजची रात्र ठरणार वैऱ्याची
By admin | Published: February 15, 2017 2:50 AM