महागाई अन् बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसचे ५ ऑगस्टला जेलभरो आंदोलन; माणिकराव ठाकरेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 06:01 PM2022-08-02T18:01:43+5:302022-08-02T18:01:51+5:30
यवतमाळ जिल्ह्यात पूर व अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.
वाढत्या महागाईवर आणि बेरोजगारीवर ५ ऑगस्ट रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जेल भरो आंदोलन करणार आहे. यावेळेस काँग्रेस पदाधिकारी स्वतःला अटक करून घेणार असून आंदोलनाला तीव्र स्वरूप असल्याची माहिती माजी मंत्री मानिकराव ठाकरे यांनी दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पूर व अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेती पिके पूर्णतः पाण्यात बुडाल्याने प्रचंड स्वरूपाचे नुकसान झाले असतानाही राज्य शासनाने अद्यापही पंचनामे पूर्ण केले नाहीत, त्यामुळे ताबडतोब मदतीची आवश्यकता असलेला शेतकरी नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला आहे. अशा संकट समयी महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, दुग्धजन्य पदार्थांवर देखील आता जीएसटीचा भार लावण्यात आला आहे, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.
तसेच तरुणांना रोजगाराच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत, अशा गंभीर परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस आता आक्रमक आंदोलन करणार आहे. प्रत्येक तालुका ठिकाणी होणाऱ्या काँग्रेसच्या या जेलभरो आंदोलनात काँग्रेसचे आक्रमक स्वरूप देखील बघायला मिळेल असा इशारा देखील माणिकराव ठाकरे यांनी दिला.