शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प : मदतीसोबत पुनर्वसनही यवतमाळ : गुजरातमध्ये २००१ साली झालेल्या महाविनाशकारी भूकंपानंतर ३६८ शाळांचे निर्माण करून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. काश्मिरमध्ये आॅक्टोबर २००५ मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी ‘एनडीएमए’ने सर्वप्रथम पुनर्वसन कामासाठी भारतीय जैन संघटनेची मदत घेतली. एका महिन्यात घरे बांधून दिली, असे प्रफुल्ल पारख यांनी सांगितले. अकोला येथे २००२ साली महापूर आला होता. पूरग्रस्तांनी शाळांमध्ये आश्रय घेतला होता. ही मंडळी तेथून बाहेर निघायला तयार नव्हती. त्यावेळी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेऊन १५ हजार नागरिकांसाठी दोन तात्पुरते नगर वसविले आणि शाळा रिकाम्या करून दिल्या, असे ते म्हणाले. त्सुनामीच्या वेळी अंदमान निकोबारमध्ये आपण स्वत: १५ महिने त्या भागात होतो. ३७ बेटांवर शाळा, रुग्णालये उभारण्यात आले. २००८ साली बिहारमध्ये आलेल्या पुरात आमच्या चमूने १८० दिवस वैद्यकीय सेवा दिली. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी धावून जावून मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही मदतच नाही तर त्यांचे पुनर्वसन करतो, असे पारख यांनी सांगितले. शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासोबतच आपल्या परिसराच्या विकासासाठीही प्रोत्साहीत करतो. १९९७ मध्ये मेळघाटमधून ३०० गावातून ३२८ मुलांची निवड करून पुणे येथे शिक्षण दिले. आज ही मुले आपल्या परिसरात विकासाचे काम करीत आहे. आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण देवून त्यांना मदतीचा हात भारतीय जैन संघटना देणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच आम्ही या प्रकल्पासाठी मुलींचीही निवड करीत असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या कुटुंबात आत्महत्या झाली असेल तर त्या कुटुंबातील मुलांच्या डोक्यातही आत्महत्येचे विचार घोळत असतात. हे सर्वेक्षणातूनही सिद्ध झाले आहे. पुणे येथे शैक्षणिक प्रकल्प राबविताना तसे अनुभवही आले. परंतु त्या मुलांच्या डोक्यातील आत्महत्येचे विचार करून त्यांचा दृष्टीकोण सकारात्मक करण्याचा प्रयत्नही या प्रकल्पातून होत असल्याचे पारख यांनी शेवटी सांगितले. (नगर प्रतिनिधी)
जैन संघटना आपत्तीच्या वेळी धावून जाते
By admin | Published: January 14, 2016 3:28 AM